कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करून ‘पेण अर्बन को. ऑप. बँके’च्या दिवाळखोरीस जबाबदार असलेल्या संचालकांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
आतापर्यंत बँकेच्या संपत्तीवर जप्ती आणण्यात आली आहे. मात्र ज्यांच्यामुळे बँकेची ही अवस्था झाली त्यांच्या संपत्तीवर जप्ती अद्याप आणण्यात आलेली नाही. त्यामुळे ठेवीदारांनी अर्ज करून बँकेच्या संचालकांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची मागणी केली होती.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत संचालकांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचे निर्देश दिले. दरम्यान, १० हजारांपर्यंतच्या ठेवीदारांचे पसे परत करण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत न्यायालयाने दिली होती. एवढय़ा कमी कालावधीत हे शक्य नसल्याचे शुक्रवारच्या सुनावणीत सांगण्यात आले. मात्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवडय़ात आहे .