जयेश शिरसाट

पाच महिन्यांत साडेतीन लाख वाहनचालकांना दंड; २०० रुपये दंड भरण्याची सहज तयारी

अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तयारी मुंबई महापालिकेने चालवली असली तरी, अशा प्रकारे मनमानीपणे वाहन उभे करणारे आधीपासूनच मुंबई वाहतूक पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. गेल्या काही वर्षांत वेगमर्यादेचे उल्लंघन, विनाहेल्मेट वा मद्यप्राशन करून वाहन चालवणे यापेक्षाही सार्वजनिक ठिकाणी बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवरील कारवाईचे प्रमाण जास्त आहे. या वर्षांच्या सुरुवातीच्या पाच महिन्यांतच वाहतूक पोलिसांनी तब्बल साडेतीन लाख वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील रस्त्यांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रिकरणाच्या आधारे कारवाई सुरू केल्यापासून ‘नो पार्किंग’ क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्यांवरील कारवाईचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहनचालकांनाही नाईलाजाने अनधिकृत पार्किंग करावे लागते, असे वाहतूक तज्ज्ञ आणि पोलिसांचेही म्हणणे आहे.

वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हींआधारे कारवाई सुरु केल्यानंतर गेल्यावर्षी म्हणजे २०१८मध्ये तब्बल सहा लाख ८० हजार वाहनांवर कारवाई करत प्रत्यक्ष दंड आकारण्यात आला किंवा ई चलन धाडण्यात आली. २०१७च्या तुलनेत नो पार्किंग कारवाईचे प्रमाण तिप्पट भरते. शहरात सर्वत्र लागलेल्या सीसीटीव्हींच्या जाळ्यामुळे वरळी येथील मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बसलेल्या वाहतूक पोलीस पथकाला महत्वाच्या रस्त्यांसोबत गल्लीबोळातली नो पार्किंग स्पष्ट दिसते. या वाहनांचे नोंदणी क्रमांक टिपून परस्पर ई चलन धाडले जाते. यासोबत वाहतूक पोलीस नो पार्किंगमध्ये मोकाट उभी वाहने उचलून चौकीला नेतात किंवा ती दंड भरल्याशिवाय तेथून हलू नयेत अशी व्यवस्था करतात. २०१८मध्ये सात लाख वाहनांवर कारवाई होऊनही यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत साडेतीन लाख वाहने नो पार्किंगमध्ये उभी आढळली. याचा अर्थ नो पार्किंग कारवाईचा धाक चालकांना नाही. वाहतूक पोलीस शाखेचा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत जितकी वाहने शहराच्या रस्त्यांवर धावतात त्यांना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. वाहने आणि पार्किंगची उपलब्ध जागा हे प्रमाण व्यस्त आहे. जागा नसल्याने वाहने रस्त्यावर, नो पार्किंगमध्ये उभी केली जातात. नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास दोनशे रुपयांचा दंड आकारला जातो. ही रक्कम किरकोळ असल्याने कारवाईचा परिणाम होत नाही, असे निरीक्षणही या अधिकाऱ्याने नोंदवले.

तिसऱ्यांदा नो पार्किंगची कारवाई झाल्यास मालक-चालकाचा परवाना रद्द करण्याचा किंवा तत्सम कठोर कारवाई करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी सुचवली होती. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अशा प्रकारची कठोर कारवाई, वाहने उभी करण्यासाठी जागोजागी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्याने कारवाईचा धाकही राहिल आणि जागा उपलब्ध झाल्यास पार्किंगची समस्याही सुटेल, असे निरीक्षण या अधिकाऱ्याने नोंदवले.

शहरातील एकुण वाहनांच्या तुलनेत महापालिकेने उपलब्ध करून दिलेली वाहनतळे पुरेशी नाहीत. वाहनतळांसोबत वाहनांच्या खरेदीवर चाप आणणे, खरेदीचे नियम कठोर करणे आवश्यक आहे.

– विवेक पै, मुंबई मोबिलीटी फोरम