22 November 2019

News Flash

आणखी ३० सार्वजनिक वाहनतळ परिसरात जबर दंडवसुली

५०० मीटर क्षेत्रात उभ्या वाहनांवर पुढील आठवडय़ात कारवाई

(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद रावकर

केवळ २३ सार्वजनिक वाहनतळ परिसरापुरती मर्यादित असलेली मुंबई महापालिकेची ‘नो पार्किंग’ कारवाई आणखी विस्तारणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या मोठय़ा रस्त्यांवरील ३० सार्वजनिक वाहनतळे पालिकेच्या रडारवर असून त्यांच्या ५०० मीटर क्षेत्रात उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर पुढील आठवडय़ात कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. या संदर्भात पालिका लवकरच वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून कारवाईसाठी रूपरेषा ठरवेल.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहनतळांलगतच्या रस्त्यांवर ५०० मीटर क्षेत्रात आणि दोन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या गल्ल्यांमध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना जबर दंड ठोठावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सध्या पहिल्या टप्प्यात २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. हे वाहनतळ विकासकांकडून जादा एफएसआयच्या मोबदल्यात पालिकेला हस्तांतरित करण्यात आले होते. पुढील आठवडय़ापासून दुसऱ्या टप्प्यात मुख्य रस्त्यांवरील आणखी ३० वाहनतळांची निवड पालिकेने केली आहे. या वाहनतळांच्या आसपास बेशिस्तपणे वाहने उभी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. या कारवाईचे समर्थन करताना पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले की, मुंबईकरांकडून कररूपात जमा झालेल्या पैशांमधूनच रस्त्यांची निर्मिती, दुरुस्ती आदी सुविधा उपलब्ध करण्यात येतात. त्यामुळे रस्त्यांवर सर्वच मुंबईकरांचा एकसमान अधिकार असायला हवा.  सार्वजनिक ठिकाणी बेकायदा वाहन उभे करून ते अन्य नागरिकांच्या हक्कांची पायमल्लीच करत असतात.

सुमारे १४ लाखांची दंडवसुली

७ जुलैपासून सुरू झालेल्या या कारवाईअंतर्गत आतापर्यंत (१० जुलै) ३३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १६८ चारचाकी, ११ तीनचाकी, १५५ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तसेच वाहन मालकांकडून तब्बल १३ लाख ९६ हजार १५० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर काही वाहने दंड न भरल्यामुळे अद्याप पालिकेच्या ताब्यात आहेत.

मोठय़ा रस्त्यांवर दुतर्फा उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक मंदावते आणि त्याचा सार्वजनिक वाहतुकीलाही फटका बसतो. तसेच खासगी वाहनांमुळे प्रदूषणात मोठी भर पडते. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली नाहीत, तर रस्ते मोकळे होतील. परिणामी बेस्टची बस विनाअडथळा धावू शकेल आणि बेस्टची परिस्थिती सुधारेल.

– प्रवीणसिंह परदेशी

First Published on July 12, 2019 1:38 am

Web Title: penalties in 30 public parking complexes abn 97
Just Now!
X