मुंबई : करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध सुरू के लेली दंडात्मक कारवाई भ्रष्टाचाराचे कुरण बनू नये म्हणून दंडाची रक्कम १००० रुपयांवरुन २०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांसाठी मुखपट्टीचा वापर बंधनकारक आहे. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर १००० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन खात्याला दिले होते. त्यानुसार ९ एप्रिलपासून मुंबईत दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. दंडाची रक्कम अधिक असल्यामुळे नागरिकांकडून पालिकेवर टीका होत आहे. दंडाची रक्कम अधिक असल्यामुळे थोडीफार रक्कम देऊन नागरिक कारवाईतून सुटका करून घेण्याची शक्यता वाढू लागली होती. मुळात कारवाईपेक्षाही करोना संसर्ग टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे दंडाची रक्कम २०० रुपये करण्यात आली आहे. दंडवसुलीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनाच ‘मार्शल’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

जुन्याच पावत्यांवर दंडवसुली

दंडाची रक्कम कमी करण्यात आली असली तरी पालिकेकडे त्याच्या पावत्या तयार नाहीत. तातडीने हा निर्णय घेतल्याने पावत्या छापण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे जुन्याच पावत्यांद्वारे दंड वसूल  करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याबाबत पालिकेकडून वारंवार प्रबोधन करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करायला हवा इतकाच या कारवाईमागचा उद्देश आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त, मुंबई महापालिका