प्रोरेटा चटई क्षेत्रफळ उपलब्ध झाल्याने उपनगरांना दिलासा

परवडणाऱ्या घरांसाठी आग्रही असलेल्या भाजप-सेना शासनाने म्हाडा वसाहतींसाठी आवश्यक असलेले प्रोरेटा चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिल्यामुळे उपनगरातील अनेक रखडलेल्या गृह प्रकल्पातील अडथळे दूर झाले आहेत. यामुळे उपनगरातील विशेषत: अंधेरी, गोरेगाव तसेच वांद्रे येथील रखडलेले म्हाडाचे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

म्हाडा वसाहतींना चार इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित विकास आराखडय़ातही नमूद आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी संभाजी झेंडे यांनी शासनाला सादर केलेल्या प्रस्तावातही म्हाडा वसाहतींना चार इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देताना त्यापैकी एक इतक्या चटई क्षेत्रफळाइतकी परवडणारी घरे बांधून घ्यावीत, असे नमूद आहे. याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र प्रोरेटा चटई क्षेत्रफळाबाबत माजी सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी यांची समिती नेमून त्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्यामुळे प्रोरेटा वितरणावरील बंदी उठली. आता प्रोरेटा चटई क्षेत्रफळ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने रखडलेल्या अनेक प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा अंधेरीतील डी. एन. नगर परिसराला होणार आहे. या परिसरात ३० ते ४० इमारतींचे बांधकाम सुरू असून त्यातून अडीच हजार घरे निर्माण होणार आहेत.

म्हाडाच्या अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर, गोरेगावातील शास्त्रीनगर तसेच वांद्रे येथील गांधी नगर येथे अनेक प्रकल्प प्रोरेटा चटई क्षेत्रफळ नसल्यामुळे रखडले होते. प्रोरेटा चटई क्षेत्रफळ उपलब्ध नसल्यामुळे डी. एन. नगरमध्ये सर्वाधिक इमारतींचे बांधकाम रखडले होते. डी. एन. नगर हे मेट्रोचे प्रमुख जंक्शन असल्यामुळे सध्या या ठिकाणी घरांना सर्वाधिक मागणी आहे. न्यू डी. एन नगरात रुस्तमजी रिएलिटीने उच्चभ्रूंसाठी घरे बांधली आहेत. त्याच वेळी डी. एन. नगरात मात्र अनेक प्रकल्पात छोटी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु केवळ प्रोरेटा चटई क्षेत्रफळ नसल्यामुळे बांधकाम रखडले होते. आता मात्र ही बांधकामे प्रोरेटा चटई क्षेत्रफळामुळे वेगाने सुरू होणार असून येत्या दोन-तीन वर्षांत डी. एन. नगरचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला जाणार आहे. भगतानी, प्लॅटिनम कॉर्प याविकासकांकडे अनेक गृह प्रकल्प असून ते आता मार्गी लागणार आहेत. त्यामुळे हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या रहिवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

प्रोरेटा चटई क्षेत्रफळ म्हणजे काय?

अभिन्यासावर (लेआउट) उपलब्ध होणाऱ्या चटई क्षेत्रफळाला एकूण रहिवासी संख्येने भागल्यावर प्रत्येक रहिवाशाच्या वाटय़ाला येणारे चटई क्षेत्रफळ.

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात प्रोरेटा चटई क्षेत्रफळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रखडलेले अधिकाधिक प्रकल्प मार्गी लागावेत आणि त्यातून घरे निर्माण व्हावीत, असे आमचे प्रयत्न आहेत

– संभाजी झेंडे, उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी, म्हाडा.