प्राणिसंग्रहालयाच्या कारभारावर टीकेची झोड;  प्राणिमित्रांची नाराजी

भायखळ्यातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्याना’त रविवारी एका दीड वर्षांच्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर उर्वरित पेंग्विनना त्यांच्या घरी परत पाठवा, अशी मागणी जोर धरू लागली असताना पालिका अधिकाऱ्यांनी मात्र नोव्हेंबरमध्ये पर्यटकांकरिता पेंग्वीन दर्शनाचा मुहूर्त गाठता यावा यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. प्राणीमित्रांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पेंग्विनच्या मृत्यूनंतर पर्यटकांसाठीचे पेंग्वीन दर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ठरल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्येच आम्ही पेंग्वीन सर्वसामान्यांना दर्शनाकरिता खुले करीत असल्याचे प्राणिसंग्राहलयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’ला सांगितले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पेंग्विनपैकी एका मादीचा रविवारी जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण प्राणिसंग्रहालयाच्या कारभाराबद्दल टीकेची झोड उठत आहे. मनसे, काँग्रेसने तर उर्वरित सात पेंग्विनना पुन्हा मायदेशी पाठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पेंग्विनच्या प्राणिसंग्रहालयातील अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक प्राणीप्रेमींनी प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडेही लक्ष वेधले आहे. त्यामुळे येत्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये पेंग्विन दर्शनाकरिता पर्यटकांसाठी खुले होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, लवकरच पेंग्विन दर्शनासाठीचे क्वारंटाइन तयार होणार असून येत्या काही दिवसांत उरलेल्या सात पेंग्विनना त्यात दाखल करण्यात येईल, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

गेल्या तीन महिन्यांपासून या पेंग्विनवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीसाठी २४ तास सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यात येत होते. मात्र तरीही दुदैवाने त्यातील एका मादीचा मृत्यू झाला. आता १५ नोव्हेंबपर्यंत क्वारंटाइन बनविण्याचे आदेश प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. परंतु, इतक्या कमी वेळात त्याचे काम पूर्ण झाले तरी सध्या उर्वरित पेंग्वीन वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. त्यांना दर्शनासाठी खुले करणे इतक्या कमी वेळेत शक्य आहे का, या बाबत प्रश्न आहे. परंतु, महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने त्या पूर्वीच पेंग्वीन दर्शनाचा मुहूर्त गाठण्याचा प्रयत्न आहे.