* पेंग्विनना मुंबईची हवा मानवतेय * बोंबिल आवडते खाद्य

भायखळ्याच्या वीर जिजामाता भोसले उद्यानात आणलेल्या पेंग्विनवरून राजकारणातील जोडय़ा परस्परांविरोधात उभ्या ठाकल्या असल्या तरी, प्राणिसंग्रहालयातील अडीचशे चौरस फुटांच्या काचघरात वावरणाऱ्या पेंग्विननी मात्र, आपापल्या जोडय़ा तयार केल्या आहेत. जोडीदारासोबत फिरणे, मनसोक्त डुंबणे, पोहोण्याची शर्यत लावणे अशा क्रीडा करणाऱ्या या पेंग्विनना आता मुंबईची हवा मानवू लागली असून कोकण किनारपट्टीवर मिळणारे बोंबिल हे त्यांचे आवडते खाद्य बनले आहे.

उद्यानातील क्वारंटाइन कक्षाला लावलेल्या काचेतून काळ्या कोटवाल्या पाहुण्यांचा दिनक्रम अतिशय निवांतपणे पाहता येतो. पेंग्विनची देखभाल, व्यवस्था याची पाहणी करण्यासाठी या क्वारंटाइन कक्षाला भेट दिली असता, मुंबईच्या हवेत पेंग्विन रुळल्यासारखे दिसत होते. आतल्या छोटेखानी डबक्यात दोघा पेंग्विनची शर्यत लागली होती. कदाचित दुपारचे जेवण नुकतेच झाल्याने ही शतपावलीही असावी. बाकीचे पाच जण भरल्या पोटी काठावर उभे राहून मजा बघत होते.

दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर २४ तास चित्रीकरण सुरू असल्याने पेंग्विनला झोपलेले पाहण्याची मजाही अनुभवता आली. माणसांप्रमाणेच झोपेचे चक्र असलेले पेंग्विन आडवे होऊन झोपतात. मोल्ट मात्र रात्री दोन वाजताही मस्त डुंबत होता. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पेंग्विनच्या जोडय़ा जमत असल्याचे समजून आले. मोल्ट आणि बबल लहान असल्याने ते अजूनही एकटे आहेत. मात्र ऑलिव्ह, डेझी, डोनाल्ड, फ्लिपर आणि पोपेय यांच्यातून दोन जोडय़ा झाल्या आहेत. मात्र या पेंग्विनना कॅमेऱ्यातून ओळखणे शक्य नाही आणि जवळ गेल्यावर ते पटकन वेगळे होत असल्याने कोणाची कोणाशी जोडी जमली आहे हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. साधारण दोन वर्षांनंतर पेंग्विन वयात येतात. एकदा जोडीदार निवडला की ते त्याची आयुष्यभर सोबत करतात. दुर्दैवाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर ते त्यानंतर एकटे राहतात, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. वर्षांतून साधरणत: दोन वेळा अंडी घातली जातात. अंडी ३५ दिवस उबवल्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर दोन्ही पिले जिवंत राहतात. पेंग्विन साधारण १५ ते १८ वष्रे जगतात, असेही ते म्हणाले.

पाहुण्यांना बोंबिलची चटक

पेंग्विनना मऊ, मांसल मासे आवडतात हे माहिती असल्याने इथे आल्यावर त्यांना बोंबिल देण्याचा प्रयोग करण्यात आला आणि तो चांगलाच यशस्वी ठरला. बोंबिलावर त्यांच्या पडलेल्या उडय़ांमुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न चुटकीसरशी संपला. अर्थात त्यांना देण्यात येणारे बोंबिल हे बाजारातून उचलून आणता येत नाहीत. पकडताक्षणीच वजा १८ अंश से.ला गोठवलेले, निर्यातीचा दर्जा असणारे बोंबिल त्यांच्यासाठी खास मागवले जातात.

शिस्तीने भोजन

सकाळी आठ व दुपारी साडेतीन वाजता भोजन. आहारात तारलीसारखे लहान मासे, बोंबिल दिले जातात. पूर्वी त्यांना जेवणासाठी बोलावताना कसरत करावी लागायची, मात्र आता ते जेवणाच्या शिट्टीसाठी प्रशिक्षित झाले आहेत. आपला वाटा तोंडात मिळाला की मागे पळत सुटतात. गंमत म्हणजे दीड वर्षांची बबल ही पेंग्विन या सगळ्यांचे जेवणाचे नेतृत्व करते, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.

पोहोण्याची आवड

मोल्ट हा या गटातला सर्वात लहान सदस्य. घरातल्या लहान मुलाप्रमाणेच तो द्वाड असल्याचे निरीक्षण पेंग्विनची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी नोंदवले. भन्नाट पोहणाऱ्या मोल्टला पाण्याबाहेर काढणे अवघड होऊन बसते आणि एकही सदस्य मागे राहिला तरी इतर पेंग्विन जागचे हलत नाहीत.