पश्चिम रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी गाडीच्या डब्याची रुळावरून घसरण, ट्रान्स हार्बर मार्गावर पेंटाग्राफचा बिघाड आणि मध्य रेल्वेवर रुळांमध्ये अडकलेला डंपर या तीन घटनांनी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हालहाल केले. या सर्व गोंधळाबाबत रेल्वेस्थानकांवर मात्र कोणतीही सूचना दिली न गेल्याने सकाळच्या सुमारास सर्वच स्थानकांमध्ये दुप्पट गर्दी दिसत होती.
पश्चिम रेल्वेवर २६ जानेवारीस मध्यरात्री चर्चगेट रेल्वे स्थानकातून मरिन लाइन्सला साइडिंगला निघालेल्या गाडीचा डबा रुळावरून घसरला होता. हा डबा रुळावर आणण्यासाठी काही तास लागले, तर रविवार-सोमवारच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास कांदिवली कारशेडमध्ये निघालेल्या उपनगरी गाडीचा एक डबा रुळावरून घसरला. त्यामुळे धिम्या मार्गावरून होणारी वाहतूक विस्कळीत झाली. बोरिवलीच्या फलाट क्रमांक १, २ आणि ७ येथील वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी ६.३० वाजता घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यात यश आले तरी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. सुमारे अर्धा तास विलंबाने वाहतूक सुरू होती. यादरम्यान १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
हा गोंधळ सुरू असतानाच पहाटे ५.३० च्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावर ऐरोली येथे वाशीकडे येत असलेल्या उपनगरी गाडीचा पेंटाग्राफ अचानक तुटला. यामुळे या मार्गावरील वाशी-पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल दोन तास बंद पडली. तुर्भे, कोपरखैरणे, नेरुळ, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांचे तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. या काळात प्रवाशांना मेन लाइनने कुल्र्यावरून वाशीमार्गे जाण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात येत नव्हती. ७.३० वाजण्याच्या सुमारास पेंटाग्राफची दुरुस्ती झाल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र सकाळी १०.३० वाजेपर्यंत गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीतच होते.
दोन मार्गावर हा गोंधळ सुरू असतानाचा दिवा स्थानकाजवळ सकाळी १०.१० वाजता रेल्वे फाटकातून जाणारा डंपर ऐन रुळांवरच बंद पडला आणि जलद मार्गावरील वाहतूक बंद झाली. १०.५० वाजता दुसरा ट्रक आणून बंद पडलेला डंपर मार्गातून हटविण्यात आला. यादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अर्धा तास पूर्णत: बंद झाली होती. धिम्या मार्गावरही याचा परिणाम झाला आणि ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान फक्त वाहतूक सुरू ठेवण्यात आली. मात्र याबाबतची कोणतीही सूचना कोणत्याही स्थानकावर देण्यात येत नव्हती. यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. तीन दिवसांच्या सुटीनंतर कामावर निघालेल्या प्रवाशांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.