डोंगरी या ठिकाणी कौसरबाग इमारत कोसळली आहे. याठिकाणी अरुंद रस्ते असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. या ठिकाणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेला कोण जबाबदार आहे याचा जाब स्थानिकांनी त्यांना विचारला. मात्र ही वेळ दोषी कोण हे शोधण्याची नसून जे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना वाचवण्याची आहे असे महापौरांनी म्हटले आहे. एकदा मदत आणि बचावकार्य संपलं आणि लोकांना सुखरुप बाहेर काढलं की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही आश्वासन त्यांनी दिलं.

मुंबईतल्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या घटनेत आत्तापर्यंत सात जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी विकासकाची चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. दरम्यान या ठिकाणी जेव्हा महापौर विश्वनाथ महाडेश्वर भेट देण्यासाठी आले तेव्हा त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

आज सकाळी ११.३० वाजता कौसर बाग इमारत कोसळली. या इमारतीत १२ ते १५ कुटुंबं रहात होती त्यामुळे ढिगाऱ्याखाली ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. लवकरात लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रय़त्न सुरु आहेत.