संदीप आचार्य
मुंबई : दीपक आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन जेमतेम एका रुग्णालयात पोहोचला. तेथे उपचार होणार नाहीत असे समजल्यावर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होता. अनेक तासांच्या शोधानंतर काही हजार रुपये मोजले तेव्हा त्याला एक रुग्णवाहिका मिळाली. मुंबईत एकीकडे करोना व्यतिरिक्तच्या रुग्णांना उपचार मिळण्याची मारामार आहे तर दुसरीकडे रुग्णवाहिकाही मिळत नाही, अशी अवघड परिस्थिती आहे.

राजेशला छत्रपती शिवाजी टर्मिनसहून केईएममध्ये जायचे होते. १०८ क्रमांकावर फोन केला तर किमान सव्वातास यायला लागेल असे उत्तर मिळाले. अखेर राजेशनेही कशीबशी एक रुग्णवाहिका मित्राच्या मदतीने मिळवली खरी परंतु त्यासाठी तब्बल साडेतीन हजार रुपये मोजावे लागले. मुंबईत आज जवळपास प्रत्येक रुग्णाचे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने हाल होत आहेत. एरवी मुंबईत पक्षाचे झेंडे लावलेल्या शेकडो रुग्णवाहिका गल्लीबोळात फिरत असतात. मात्र ‘गर्व से कहो’ म्हणणाऱ्यांपासून सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या रुग्णवाहिका करोना काळात गायब झालेल्या दिसतात.

राजकीय पक्षाच्या रुग्णवाहिकांना फोन केला तर रुग्णवाहिका गॅरेजमध्ये असल्याचे ठरलेले उत्तर मिळते. बहुतेक या सर्व रुग्णवाहिकांना करोनाची लागण झाली असावी, अशी मार्मिक टिप्पणी ठाण्याच्या संदीप पाटणकर यांनी केली. यातील गंमतीचा भाग सोडला तरी रुग्णवाहिचे चालक तसेच मदतनीस यांनाही करोनाच्या भीतीचा विळखा असल्यानेच खासगी किंवा पक्षीय रुग्णवाहिका फारशा रस्यांवर दिसत नाहीत. ज्या थोड्याफार रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जातात ते अवाच्या सवा पैसे आकारतात. मुंबई महापालिकेकडेही आज १०८ च्या केवळ ६० रुग्णवाहिका असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यातील बहुतेक रुग्णवाहिका संस्थात्मक क्वारंटाइनसाठी लोकांची ने आण करण्यात जास्त गुंतलेल्या असतात. बहुतेक रुग्णवाहिकेतून एकाच वेळी चार पाच रुग्णांना नेण्यात येत असल्यामुळे त्यांचा एरवीचे प्रत्यक्षातील वेळेचे गणित चुकते. १०८ क्रमांकाची सेवा चालविणाऱ्या संस्थेने मुंबईसाठी आणखी ५० रुग्णवाहिका देण्याची तयारी दाखवली असली तरी याबाबत अद्यापि निर्णय झाला नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

“मुंबईत रुग्णवाहिकांचा तुटवडा झाल्यामुळे करोनाचे व अन्य रुग्णांचे कमालीचे हाल होत आहेत” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. “रुग्णवाहिका चालवणारीही माणसेच असून त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना पालिकेने मास्क व करोना संरक्षित पोषाख दिला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची हमी घेतल्यास काही प्रमाणात खाजगी रुग्णवाहिका तसेच पक्षाच्या रुग्णवाहिका चालक तयार होतील”, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

यातील महत्वाचा भाग म्हणजे पालिका नियंत्रण कक्षात अशा रुग्णवाहिकांची नोंद करून त्यांना थोडे जास्तीचे मानधन दिल्यास रुग्णांची होणारी फरफट संपेल. त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्णालयात रुग्णवाहिका डेस्क तयार करून तेथूनही रुग्णांसाठी मदत करण्याची गरज आहे. अनेकदा रुग्णांना रुग्णवाहिका कुठे शोधायची हा प्रश्न पडतो. करोनाच्या काळात तर रुग्णवाहिका शोधणे अग्निदिव्य झाले असून पालिकेने खासगी रुग्णवाहिका चालकांना पुरसे मास्क तसेच करोना संरक्षित पोषाख देऊन त्यांची मदत घेतली पाहिजे असे आरोग्यमंत्री म्हणाले.

महापालिकेत विशेष नियुक्ती करण्यात आलेल्या मनिषा म्हैसकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “रुग्णवाहिका कमी पडतात हे खरे असले तरी आम्ही त्याची लवकरच व्यवस्था करत आहोत. बेस्टनेही आम्हाला सध्या सात बसेस रुग्णवाहिकेत परावर्तित करून दिल्या असून लवकरच आणखी २० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय एसटी महामंडळाकडूनही १५ बसेस येणार असून त्यांचा वापर प्रामुख्याने संस्थात्मक क्वारंटाइनसाठी केला जाईल.सध्या आमच्याकडे १०८ क्रमांकाच्या ६० रुग्णवाहिका असल्या तरी रुग्णवाहिकांची संख्या लवकरच वाढविण्यात येईल”, असे मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.

“महापालिकेच्या केईएम, शीव, नायर रुग्णालय तसेच जे जे रुग्णालयांशी एरवी किमान ५० हून अधिक रुग्णवाहिका जोडलेल्या असतात. या रुग्णवाहिकांच्या चालकांना फेरीसाठी थोडी जास्त रक्कम पालिकेने दिली व त्यांच्या आरोग्याचा विचार करून करोना पोषाख न मास्क दिले तर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध होतील. यांचे नियमन पालिकेच्या १९१६ या नियंत्रण कक्षातून करता येईल मात्र त्यासाठी पालिकेतील उच्चपदस्थांची व नेतृत्वाची इच्छाशक्ती हवी”, असे डॉ अमोल अन्नदाते यांनी सांगितले.