|| संदीप आचार्य

डॉ. संजय ओक यांचे मत; वैद्यक क्षेत्रात दोन गट

मुंबई: वाढत्या करोनाला रोखण्यासाठी सरकार कडक टाळेबंदी लागू करण्याची दाट शक्यता असली तरी वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये टाळेबंदी लागू करण्यावरून दोन गट पडले आहेत. एका गटाच्या म्हणण्यानुसार टाळेबंदीचा आता काहीच उपयोग नाही. उलट टाळेबंदी केल्यास करोना वाढेल तर  दुसऱ्या गटातील डॉक्टरांचे म्हणणे आहे, लोकांचा जीव वाचविण्यासाठी टाळेबंदी हाच आत्ताच्या घडीला एकमेव उपाय आहे. तर राज्याच्या कृतीदलाचे प्रमुख डॉ संजय ओक यांच्या म्हणण्यानुसार लोकच सरकारला टाळेबंदी लावायला भाग पाडत आहेत.

राज्यात गेले आठवडाभर रोज ५० हजाराहून अधिक करोना रुग्ण सापडत आहेत. करोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे राज्य सरकारने कडक टाळेबंदीचा इशारा देत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर खाजगी व शासकीय डॉक्टरांची कडक टाळेबंदीबाबत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता  बहुतेक डॉक्टरांनी भाष्य करणे टाळले.  काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर टाळेबंदी योग्य नसल्याचे तसेच जास्त नुकसान करेल असे मत व्यक्त केले. एका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मध्यंतरी अकोला व अमरावतीमध्ये पंधरा दिवस टाळेबंदी लागू करूनही तेथे काहीही उपयोग झाला नव्हता. उलट करोना वाढतच गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे राज्याचे आर्थिक कंबरडे पूर्ण मोडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था अधिक वाईट होण्यापलीकडे टाळेबंदीमधून काहीच साध्य होणार नाही.

या पाश्र्वाभूमीवर राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व राज्याचे प्रमुख करोना विषयक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी करोना रोखण्यासाठी टाळेबंदीला दुसरा पर्याय काय आहे असा सवाल करत टाळेबंदी लागू झाली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका मांडली. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. गोरगरीब लोकांचे हाल होणार हे मान्य आहे पण त्याहीपेक्षा आज लोकांचे जीव वाचणे जास्त महत्वाचे आहे असे डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले. करोनाची साखळी तोडली तर वाढणारा करोना रोखता येईल तसेच वैद्यकीय व्यवस्था निर्माण करायला सरकारला काहीसा अवधी मिळेल.

कृती दलाचे प्रमुख डॉ संजय ओक म्हणाले लॉकडाऊन करा पण मिनी लॉकडाऊन हे काय प्रकरण आहे ते कळू शकत नाही. हे म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन सुप – टू बाय थ्री करा सांगण्यासारखे आहे. रोखा  पण शेजाºय्ला, मला ऑफिसला जाऊ द्या हे सांगण्यासारखे आहे, असे म्हणत डॉ ओक यांनी मिनी लॉकडाऊनची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. टाळेबंदीच्या परिणामांचा विचार करून शासन त्याबाबत निर्णय घेईल असे सांगून डॉ ओक म्हणाले, सरकार लोकांवर टाळेबंदी लादत नाही तर लोकच शासनाला टाळेबंदी लागू करण्यासाठी हतबल करत आहे.  महापालिकेच्या एका ज्येष्ठ अधिष्ठात्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत टाळेबंदीची गरज नाही.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन‘ ( आयएमए) च्या ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी टाळेबंदीचे ठाम समर्थन केले. टाळेबंदीमुळे करोनाची साखळी तर तुटेलच शिवाय सध्या रुग्णालयांवर असलेला ताण कमी होईल.