एरवी उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. लोखंडवाला बॅकरोड येथील ‘लोखंडवाला लेक’ या तळ्याला त्याचं गतवैभव मिळवून देण्यासाठी या परिसरातील डॉक्टर, आर्किटेक्ट, व्यावसायिक आणि नोकरदार असे २०० हून अधिक नागरिक हातमोजे घालून हातात झाडू, कुदळ, फावडा, घमेलं घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

‘बी हॅप्पी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या ‘सेव्ह लोखंडवाला लेक’ या मोहिमेत रविवारी इथल्या नागरिकांनी श्रमदान करून आदर्श घालून दिला. सकाळी ८.३० वा. तळ्याकाठी हे सर्वजण एकत्र जमले आणि “हम होंगे कामियाब एक दिन…” हे गीत त्यांनी एकसूरात गाऊन कामाला सुरुवात केली. याविषयी अधिक माहिती देताना ‘बी हॅप्पी फाऊंडेशन’च्या अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सांगितलं की, “निर्माल्य आणि कचरा यांमुळे एकेकाळी सुंदर असलेल्या या तळ्यात बगळे, विविध प्रकारची बदकं आणि पाणपक्षी मोठ्या संख्येने आहेत. या वर्षी पहिल्यांदाच इथे फ्लेमिंगोसुद्धा आले होते. मात्र या तळ्यात गाळ साचल्यामुळे तसंच कचरा टाकल्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. गलिच्छ परिसरामुळे या तळ्याच्या परिसरात नागरिकांना निसर्गाचा आनंदही उपभोगता येत नाही. सत्ताधारी किंवा प्रशासन याबाबत काहीतरी करेल, याची वाट बघत बसण्यापेक्षा आम्ही सर्वांनी नागरिक म्हणून थेट कृती करण्याचा निर्णय घेतला. आमची ही कृती म्हणजेच ‘लोखंडवाला तळे वाचवा’ ही मोहीम होय.”

“आजचा हा प्रयत्न म्हणजे फक्त सुरुवात आहे. लोकसहभागातून हे तळे सुंदर, स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र येत्या सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने विविध प्रशासकीय परवानग्या मिळवून तळ्यातील गाळ उपसण्याचेही काम करावे लागेल”, अशी माहिती ‘बी हॅप्पी फाउंडेशन’चे विश्वस्त प्रशांत राणे यांनी दिली.

“तळ्याच्या काठी तसंच तळ्याभोवतीच्या झाडाझुडपांमध्ये नागरिकांनी आज सफाई करून निर्माल्य, कचरा आणि गाळ जमा केला. या कचऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर वस्तू सापडल्या” असं ‘बी हॅप्पी फाउंडेशन’चे विश्वस्त सुरजीतसिंग दडीयाला यांनी सांगितलं