देशांतर्गत पर्यटनापेक्षा विदेश भ्रमंतीला जास्त पसंती
दिवाळीच्या सुट्टीत एकत्र जमून फ राळावर ताव मारायचा, कित्येक दिवसांच्या गप्पा पूर्ण करायच्या, थोडीशी खरेदी, थोडासा फेरफटका, हॉटेलिंग असा सगळा बेत आखत घरच्या घरीच दिवाळी साजरा करणाऱ्या मराठी माणसाचे हे चित्र यंदाच्या दिवाळीत तरी कमालीचे बदललेले आहे. दिवाळीत घरी भेटण्याऐवजी सगळ्यांनाच बरोबर घेऊन दिवाळीचा आठवडा एखाद्या नव्या देशाच्या भटकंतीत घालवण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनात २५ टक्क्याने, तर आंतरराष्ट्रीय पर्यटनात ३० टक्क्याने वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतीय पर्यटक मनसोक्तपणे पर्यटनाचा आनंद घेत आहेत, असे दिसून येते आहे. दिवाळीचा सण, मुलांच्या सुटय़ा आणि आठवडाभराच्या जोडून आलेल्या सुटय़ा यामुळे एरव्ही एकत्र यायला जमत नाहीत, अशी मंडळी यानिमित्ताने सहज एकत्र येतात. त्यामुळे ही सुट्टी घरात एकत्र घालवण्यापेक्षा बाहेर फिरण्यात घालवण्यावर पर्यटक भर देत आहेत, अशी माहिती ‘हॉलिडे आयक्यू’चे संस्थापक हरी नायर यांनी दिली. यावर्षी एकूणच सणांच्या निमित्ताने होणाऱ्या पर्यटनात २८ टक्क्याने वाढ झाली असल्याचे नायर यांनी सांगितले. मात्र दिवाळीच्या सुट्टीत देशांतर्गत पर्यटनापेक्षाही देशविदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंगापूर, दुबई, मालदीव, भुतान, थायलंड, मॉरिशस, श्रीलंका, बाली, मलेशिया, ऑस्ट्रेलिया ही पर्यटकोंची नेहमीची पसंतीची ठिकाणे आहेत. पण, याचबरोबर तुर्की, कोरिया आणि अबुधाबीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. शिवाय, फ्रान्स-जर्मनी या देशांबरोबरच क्रुझवर पर्यटनासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण ४६ टक्क्याने वाढले असल्याचे ‘थॉमस कुक’च्या आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जतिंदर पॉल सिंग यांनी सांगितले.
देशांतर्गतही पर्यटन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या निमित्ताने अंदमान-निकोबार, केरळ, मनाली, सिमला, काश्मीर, गंगटोक, सिक्कीम, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश आणि गोवा तसेच कोकण किनारपट्टी ही पर्यटकांची आवडती ठिकाणे असल्याचे ‘थॉमस अँड कुक’चे राजीव काळे यांचे म्हणणे आहे. कुठल्याही मोठय़ा सहलीचे नियोजन करताना ते तीस दिवस आधी के ले जाते. मात्र, दिवाळीच्या सुटय़ांचे पर्यटकांकडून हमखास नियोजन के ले जाते. सध्या कमीत कमी ९० दिवस आधीपासून पर्यटक आपल्याला आवडणाऱ्या ठिकाणांचे बुकिंग करताना दिसतात, असे हरी नायर यांनी सांगितले.

अ‍ॅपच्या मदतीने पर्यटनस्थळाची निवड
सध्या मोबाइल अ‍ॅपचा वापर वेगाने वाढला असल्याने पर्यटक आपण खर्च करतो आहोत त्यात योग्य ते हॉटेल, पर्यटनाची स्थळे नेमकी कोणती आहेत, यासंबंधीची सगळी माहिती अ‍ॅपवरून जमा करतात. एकदा ऑनलाइन खातरजमा करून घेतल्यानंतर आपल्याला हव्या त्या ठिकाणाचे बुकिंग केले जाते. सध्या ७५ टक्के बुकिंग्ज ही मोबाइलच्या अ‍ॅपवरून होत असल्याचे नायर यांनी सांगितले. तर पर्यटनासाठी केवळ मेट्रो शहरांमधूनच नाही तर निमशहरी भागातूनही मागणी वाढली असल्याचे राजीव काळे यांनी सांगितले.