काव्यमय शब्दांत आपल्या आप्तजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बाजारात निरनिराळ्या प्रकारची शुभेच्छापत्रे आली असली, तरी त्याला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. व्हॉटस् अॅप, फेसबुक आदी माध्यमांतील ‘स्मार्ट’ भाषेमुळे तरुण पिढीचे भावनांच्या अभिव्यक्तीचे स्वरूपही बदलले आहे. परिणामी शुभेच्छापत्रांचा खप दरवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे शुभेच्छापत्रे अखेरचा श्वास मोजत आहेत की काय, अशी चिंता शुभेच्छापत्रांची निर्मिती करणाऱ्यांपासून ते शुभेच्छापत्रांचे लेखक-विक्रेते व्यक्त करत आहेत.
दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्र भेट देण्याचा ‘ट्रेंड’ सर्वत्र होता. मराठी भाषेतील शुभेच्छापत्रांची बाजारात चलती असायची. यावर्षी मात्र शुभेच्छापत्रांची मागणी घटली आहे. भ्रमणध्वनींचे लघुसंदेश, व्हॉटस् अॅप याला कारणीभूत असण्यासोबतच यावर्षी कागदांचे भाव वाढल्याने शुभेच्छापत्रांचे भावसुद्धा वाढले आहेत. साधारणपणे १५ रुपयांपासून ते ४००-५०० रुपयांपर्यंतच्या किमतीत ही शुभेच्छापत्रे उपलब्ध आहेत.
‘शुभेच्छापत्रे घ्यायला येणाऱ्या लोकांची संख्या अलीकडे फारच कमी आहे. शिवाय तरुणांचा शुभेच्छापत्रे घेण्याकडे कमी कल आहे. बँक, व्यावसायिक कार्यालये यांत दिवाळीनिमित्त मोठय़ा प्रमाणात शुभेच्छापत्रे घेतली जात असत. परंतु यावर्षी तिथून अजिबात मागणी नाही, असे मराठी शुभेच्छापत्रे उपलब्ध अलेल्या मुलुंड येथील ‘गणेश स्टोर्स’च्या नितीन गंगर यांनी सांगितले. वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे इत्यादी दिवसांसाठी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छापत्रांना थोडाफार प्रतिसाद असला, तरी दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत सुमारे दीड हजार शुभेच्छापत्रांचा असणारा खप हा यावर्षी पन्नासचा आकडाही अद्याप गाठू शकला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी माध्यमांमुळे शुभेच्छापत्रांना असणारी मागणी खूपच कमी झाली आहे. दरवर्षी मी १०० ते २०० शुभेच्छापत्रे लिहायचो, परंतु यावर्षी केवळ २० शुभेच्छापत्रे लिहली आहेत, अशी खंत गेली १८ वर्षे शुभेच्छापत्रे लिहणारे प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मात्र बदलत्या काळाबरोबर भावना व्यक्त करण्याची माध्यमे बदलत असतात. त्यामुळे शुभेच्छापत्रांच्या बाबतीत नव्या माध्यमांच्या अनुषंगाने काही बदल करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ई ग्रीटिंग्स’ या नव्या स्वरूपात आम्ही शुभेच्छापत्रांना आणत आहोत, असेही त्यांनी सांगितले.