पूर्वीचे लोक वचन पाळायचे, साथ देणाऱ्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवायचे पण आता सगळे वेगळे आहे. सोबत राहिल्यानंतरही रात गई बात गई.. असा प्रकार चालतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता चिमटे काढले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच माजी सदस्यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी या दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपलाही चिमटे काढले. युतीसाठी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवल्याच्या प्रकरणावरून ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोले लगावले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जी यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. मलासुद्धा त्यांना तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांनी शिवसेनेने साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण आता वेगळे आहे. वर्षांनुवर्षे साथ दिल्यानंतरही लोक रात गई बात गई.. असे वागतात, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

स्वातंत्र्यलढय़ात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांनी योगदान दिले. असा गौरव मुख्यमंत्री ठाकरे यांनी निलंगेकरांचा केला.

कंगनाचा समाचार

शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरून काम केले. नगर जिल्हय़ातून २५ वर्षे आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे घराणे मूळचे राजस्थानचे. ते आधी मुंबई व तेथून नगरला स्थायिक झाले. महाराष्ट्रामुळे आपण मोठे झालो याची जाणीव त्यांनी कायम ठेवली. आजकाल लोक मुंबईत येऊन पैसा-प्रसिद्धी मिळवतात, पण त्याची जाणीव ठेवत नाहीत, अशा शब्दांत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणावताचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाचार घेतला.