मनसेच्या संताप मोर्चाच्या वेळी झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आणि निर्णयांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची सगळी आश्वासने विसरले. ‘अच्छे दिन’ कुठे आहेत? प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते ते १५ लाख रूपये कुठे आहेत? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घ भाषणांचाही उल्लेख त्यांनी केला. हल्ली टीव्ही लावला आणि भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले तर लोक आता टीव्ही बंद करतात, लोक एवढे कंटाळले आहेत. कंटाळालो म्हणून आपण रेडिओ  लावला तर तिथेही त्यांची ‘मन की बात’ सुरू असते अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

गुरुवारी मुंबईत मनसेचा संताप मोर्चा निघाला तो एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीचा निषेध करण्यासाठी. राज ठाकरे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मात्र त्यांनी मुंबईकरांच्या प्रश्नासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. बुलेट ट्रेन ही फक्त ठराविक गुजराती व्यापाऱ्यांसाठी आणली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त मोठमोठी भाषणे देणे माहित आहे. नोटाबंदीचा निर्णय, स्वच्छ भारत अभियान आणि योगाचे प्रयोग करून पंतप्रधानांनी या देशातील सगळ्याच जनतेचे नुकसान केले असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींइतका खोटे बोलणारा पंतप्रधान आजवर बघितला नाही या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा रतन टाटा यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर मी गुजरात दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी माझ्यासमोर गुजरातच्या विकासाचे जे चित्र उभे करण्यात आले ते खोटे होते. देशातही सध्या हीच परिस्थिती आहे. फक्त विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे देशात मंदीचे सावट आहे. येत्या काळात अनेक तरूणांना या मंदीमुळे नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असेही राज ठाकरेंनी म्हटले.