ध्वनिक्षेपक लावण्याबाबत आलेल्या वेळेच्या मर्यादेमुळे गेली काही वर्षे मुंबईत सेलेब्रिटीजच्या संगतीत अगदी पहाटेपर्यंत रंगणाऱ्या दांडिया रास किंवा गरब्याचा रंग फिका झाला आहे. या दांडियामध्ये रंगीबेरंगी घागरा-चोली, झब्बो किंवा केडिया-पायजमा, पगडी घालून गरबा किंवा दांडिया खेळायला उतरणाऱ्या तरुण-तरुणींची चांगलीच लगबग असते, परंतु ध्वनिप्रदूषणामुळे आलेल्या वेळेच्या मर्यादेमुळे हा पारंपरिक पेहराव घालून गरबा खेळणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. या मोठा जामानिमा असलेल्या पेहरावाची जागा कची काम केलेल्या जॅकेटनी घेतली आहे. त्यामुळे, राजस्थान, गुजरातमधून हे जॅकेट्स विकण्यासाठी आलेल्या फेरीवाल्यांपासून ते ई-कॉमर्स संकेतस्थळांवर जॅकेट्सला यंदा चांगली मागणी आहे.
दांडिया रास किंवा गरबा म्हटले की गुजराती पद्धतीचा चणिया चोळी, घागरा चोळी, लेहंगा चोळी हा स्त्रियांचा पेहराव डोळ्यांसमोर येतो. सोन्या, मोत्यापेक्षाही चांदीच्या दांगिन्यांनी या पेहरावाला आणखीनच साज चढतो. काचकाम, जरीकाम, कशिदाकाम केलेली चणिया चोळी किंवा घागरा चोळी घालून गरब्यात उतरणे म्हणजे मोठे काम असते. कारण, पेहराव घालण्यापासून त्यावर दागिने, मेकअप असा साजशृंगार चढवेपर्यंत सुमारे तास-दीड तास वेळ सहज खर्च होतो.
पुरुषांचीही तीच अडचण! एरवी झब्बा, केडिया, पायजमा, धोती, लेहंगा यावर पगडी असा पुरुषांसाठीचा जामानिमा असतो. हे पारंपरिक पेहराव गरब्याचे किंवा दांडियाची शोभा वाढवीत असले तरी ते घालून तयार होण्यासाठी लागणारा वेळ आणि ध्वनिक्षेपकामुळे पाळावी लागणारी वेळेची मर्यादा यांचे गणित बिघडू लागले आहे. नोकरी करणाऱ्या तरुणींची तर यामुळे चांगलीच अडचण होते. म्हणून अनेक जणींनी कची काम केलेल्या जॅकेटचा पर्याय शोधून काढला आहे.
ऑफिसमधून परतल्यानंतर तयारी वगैरे करून दांडियाला जायचे तर नऊ-साडेनऊ वाजून गेलेले असतात. अध्र्या-एक तासासाठी हा सगळा जामानिमा करायचा त्यापेक्षा मी वेगवेगळ्या प्रकारची जॅकेट्सचा पर्याय आजमावला आहे, असे दरवर्षी दांडिया खेळायला मोठय़ा उत्साहात उतरणाऱ्या तनिषा गढिया हिने सांगितले.
‘लुक’ही बदलता येतो
स्कर्ट, पॅण्ट, ढगळ पायजमा, लेगींज यावर हे जॅकेट घातले की काम भागले. अनेकदा या पेहरावावर ऑक्सिडाइज्डच्या दागिन्यांनी गंमत आणता येते किंवा एखादी ओढणी अथवा स्कार्फनेही त्याचा ‘लुक’ बदलता येतो. तरुण मुले किंवा पुरुषांकडूनही या जॅकेट्सना पसंती आहे. ३५० ते ५०० रुपयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जरी, कची, काचकाम केलेली ही जॅकेट्स यंदा ऑनलाइनही उपलब्ध आहेत. बोरिवली, मालाड, कांदिवलीसारख्या गुजरातीबहुल परिसरात अनेक गल्ल्यांमध्ये गुजरात, राजस्थानमधून आलेल्या फेरीवाल्यांकडेही या प्रकारची जॅकेट्स विक्रीकरिता उपलब्ध आहेत.