संदीप आचार्य
मुंबई: करोनामुळे मरण पावणाऱ्यांमध्ये कालपर्यंत प्रामुख्याने वृद्ध मंडळी तसेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदींचा त्रास होता अशांचा समावेश होता. मात्र गेल्या दोन आठवड्यातील मृत्यूंचा आढावा घेतल्यास आरोग्याचे कोणतेही प्रश्न नसलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसते आहे.

मुंबईत करोनाच्या रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे मृत्यू संख्येतही चढउतार होताना दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या १७८ मृत्यूमध्ये कोमॉर्बिडीटी नसलेल्यांचे प्रमाण १९ टक्के एवढे होते ते आता वाढल्याचे दिसत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने करोनाच्या ४४७ मृतांचे विश्लेषण केले त्यात २६ टक्के मृत्यू पावलेल्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब, श्ससनविकार तसेच ह्रदयविकाराचा त्रास नव्हता एवढेच नव्हे तर करोनाची लागण होण्यापूर्वी या सर्वांची प्रकृती सामान्य असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला मुंबईतील मृत्यूंचे विश्लेषण करण्यासाठी नियुक्त केलेल्या डॉ अविनाश सुपे समितीने १३३ मृत्यूंचे विश्लेषण केले त्यात ७९ टक्के लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आदी असल्याचे आढळून आले १३३ मृतांमध्ये ४० वयोगटापर्यंत ११ जणांचे मृत्यू झाले होते.

आता राज्यातील करोना मृत्यूची संख्या ४८५ एवढी झाली असून नव्याने डॉ सुपे समिती मृत्यूंचे विश्लेषण करत आहे. यामागे मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येईल हा प्रमुख मुद्दा असून यासाठी लक्षणे दिसल्यापासून ते रुग्णालयात पोहोचण्याचा वेळ, रुग्णालयातील उपचार, रुग्णाचे आजार, वय आदी अनेक बाबी लक्षात घेतल्या जाणार आहेत. तथापि वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेल्या ४४७ मृतांच्या विश्लेषणात कोणताही पूर्व आजार नसलेल्याच्या मृत्यूमध्ये १९ टक्यांवरून २६ टक्के एवढी वाढ झालेली दिसून येत आहे.

याबाबत डॉ सुपे यांना विचारले असता कदाचित “या रुग्णांमध्ये विषाणूची लागण अधिक प्रमाणात झाली असण्याची शक्यता आहे. तसेच अन्य कारणेही तपासावी लागतील” असे सांगितले. “सध्या आम्ही यावरच काम करत असून करोनामुळे होणार्या मृत्यूंचे सखोल विश्लेषण केल्यानंतरच निश्चित भूमिका मांडता येईल असेही त्यांनी सांगितले. मृत्यूंचे हे प्रमाण कसे कमी करता येईल यासाठीच आमच्या समितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे”, असेही डॉ सुपे म्हणाले.