संदीप आचार्य

हिमोफिलिया या रक्ताच्या दुर्मीळ आजाराच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या औषधांच्या खरेदीस विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आणीबाणी तत्त्वावर साडेसहा कोटी रुपयांच्या औषध खरेदीस १३ डिसेंबर रोजी मान्यता दिली. मात्र अद्याप या औषधांची खरेदी होऊ शकली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी मुंबई, ठाणे, नाशिक, अमरावती, सातारा, नांदेड, नागपूर, जळगाव आदी ठिकाणी औषधोपचार केंद्र सुरू केली आहेत. या रुग्णांना रक्तात गुठळी निर्माण होण्यासाठी फॅ क्टर नऊ, आठ, सात तसेच थिबा ही औषधे द्यावी लागतात. आजघडीला राज्यातील ५,७०० रुग्णांपैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना फॅक्टर आठ दिला जातो. तर उर्वरित रुग्णांना फॅक्टर सात, थिबा वा फॅक्टर नऊची आवश्यकता असते. इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱ्या औषधांच्या किमती सुमारे ३० ते ४० हजार रुपये असल्यामुळे बहुतेक रुग्णांना ही औषधे घेणे परवडत नाही. राज्यातील बहुतेक केंद्रांवर फॅक्टर सात व थिबा औषध नसल्याचा मोठा फटका रुग्णांना बसत असल्याचे ‘हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया’चे सचिव अजय पालंडे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाकडून हिमोफिलिया औषध खरेदीचा घोळ गेली काही वर्षे सातत्याने घातला जात आहे. आताही ४४ कोटी रुपयांच्या औषध खरेदीची मागणी हाफकिन औषध महामंडळाकडे नोंदवण्यात आली असली तरी त्यासाठी योग्य पाठपुरावा करण्यात आला नसल्यानेच औषध खरेदीस दिरंगाई होत आहे. यातूनच आम्ही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व संचालकांकडे पाठपुरवा केल्यानंतर तातडीच्या औषध खरेदीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र त्यालाही आता दोन आठवडे उलटल्याचे पालंडे यांनी सांगितले.

हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमित औषधपुरवठा करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानेही दिले आहेत. बऱ्याच वेळा नाशिक, सातारा व अन्य ठिकाणी औषध नसल्याने रुग्णांना मुंबई वा ठाणे येथे पाठविण्यात येते. आता केईएममध्येही फॅक्टर सातची कमतरता आहे. अशा वेळी रुग्णांनी जायचे कुठे असा सवाल करण्यात येत आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सतरा वैद्यकीय महाविद्यालये व मुंबई महापालिकेनेही या औषध खरेदीच्या खर्चाचा भार उचलावा, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आम्ही त्याबाबत पालिकेला यापूर्वीही कळवल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.

या औषधांच्या खरेदीसाठी वार्षिक सुमारे दीडशे कोटी रुपयांची आवश्यकता असून महापालिका व वैद्यकीय शिक्षण विभागानेही काही भार उचलणे आवश्यक असल्याचे हिमोफिलिया सोसायटीचेही म्हणणे आहे. याबाबत आरोग्य विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. केंद्रे यांनी सांगितले की, ‘हाफकिन औषध खरेदी महामंडळा’कडे हिमोफिलियाच्या औषधांची मागणी नोंदवली असून आगामी दोन दिवसांत तातडीची औषध खरेदी प्रक्रिया पार पडून रुग्णांना औषध उपलब्ध होईल.

हिमोफिलिया म्हणजे..

हिमोफिलिया या आजारात जखम झाल्यानंतर रक्त साकळण्याची क्रिया न होता रक्त वाहत राहत असल्यामुळे अशा रुग्णांसाठी औषध नसणे हा जीवनमरणाचा प्रश्न असतो. महाराष्ट्रात हिमोफिलियाचे ५,७०० रुग्ण आहेत. या रुग्णांसाठी आरोग्य विभागाने मुंबई, ठाणे, नाशिक, अमरावती, सातारा, नांदेड, नागपूर, जळगावसह दहा ठिकाणी औषधोपचार केंद्रे तयार केली आहेत. या रुग्णांना रक्तात गुठळी निर्माण होण्यासाठी फॅ क्टर नऊ, आठ, सात तसेच थिबा ही औषधे द्यावी लागतात.