निशांत सरवणकर

पुनर्वसन केलेले नसतानाही व्यापारी इमारतीसाठी परवानगी

वांद्रे- कुर्ला संकुलातील पथ्थर नगर या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत वांद्रे पश्चिमेतील झोपु योजनेची सांगड घालण्याची परवानगी ‘हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.‘ला (एचडीआयएल) देताना पुनर्वसनाची एकही इमारत बांधलेली नसतानाही व्यापारी वापराच्या इमारत दिमाखात उभी राहिल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या व्यापारी इमारतीचे ५० टक्केच काम झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला असला तरी प्रत्यक्षात या व्यापारी इमारतीचे काम जोरात सुरू आहे. त्याचवेळी पुनर्वसनाच्या इमारतीच्या कामाला सुरुवातही करण्यात आलेली नसल्याचे दिसून येते.

पथ्थर नगर हा वांद्रे कुर्ला संकुलातील एचडीआयएलचा मोठा झोपु प्रकल्प. त्यानंतरच येथील झोपडय़ा एक कोटीला विकल्या गेल्या. या योजनेच्या माध्यमातून ‘इन्स्पाईर बीकेसी‘ ही दहा मजली व्यापारी इमारत एचडीआयएलने उभारली. या इमारतीला सात मजल्यापर्यंतच भोगवटा प्रमाणपत्र आहे. परंतु आता ही इमारत आर्थिक चणचणीत असलेल्या एचडीआयएलने अदानी रिअल्टीला विकली आहे. परंतु या इमारतीसाठी हनुमाननगर झोपुवासीयांमुळे मिळणारे विक्रीचे चटईक्षेत्रफळ वापरण्यात आले आहे. हनुमाननगर झोपु योजनेत पुनर्वसनाची इमारत का बांधण्यात आली नाही, याची चौकशी स्थानिक आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सुरू केली तेव्हा हा घोटाळा बाहेर आला. पुनर्वसनाची इमारत बांधल्यानंतरच विक्री करावयाचे चटईक्षेत्रफळ वापरण्याची परवानगी देण्यात येते. परंतु या प्रकरणात तसे झाले नाही. तरीही हा घोटाळा नसल्याचे प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी. पी. महिषी यांचे म्हणणे आहे. आता एचडीआयएलने तीन वर्षांत पुनर्वसनाची इमारत बांधली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी वास्तविक चटईक्षेत्रफळ वापरले गेल्यामुळे विकासकाविरुद्ध आणि तो वापरण्याची परवानगी देणाऱ्या झोपु अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असतानाही प्राधिकरण गप्प आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांचा संपर्क होऊ शकला नाही. एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान यांनी वारंवार पाठविलेल्या लघुसंदेशाला प्रतिसाद दिला नाही.

हनुमान नगर झोपडपट्टी योजनेतील विक्रीचे चटईक्षेत्रफळ एचडीआयएलने वांद्रे कुर्ला संकुलातील व्यापारी इमारतीसाठी वापरण्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झोपु प्राधिकरण जागे झाले. हा घोटाळा झोपु अधिकाऱ्यांना आधी का दिसला नाही?

– अ‍ॅड. आशीष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप

पथ्थर नगर या मूळ योजनेत इतर झोपु योजना एकत्रित करण्यात आल्या आहेत. वांद्रे पश्चिमेकडील हनुमाननगर या झोपु योजनेचाही त्यात समावेश आहे. मात्र या झोपु योजनेत अद्याप पुनर्वसनाची इमारत बांधण्यात आलेली नाही. मात्र आता मातीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला देण्यात आलेली स्थगितीही उठविण्यात आली आहे.

-पी. पी. महिषी, कार्यकारी अभियंता, झोपु प्राधिकरण