21 September 2020

News Flash

..तरीही २५व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी

गर्भपात न करण्याचा डॉक्टरांकडून अहवाल

संग्रहित छायाचित्र

डॉक्टरांनी गर्भपात न करण्याचा सल्ला दिलेला असतानाही उच्च न्यायालयाने एका १७ वर्षीय मुलीला २५व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी दिली. बलात्कारातून ही मुलगी गर्भवती राहिली होती.

कायद्याने २०व्या आठवडय़ापर्यंत गर्भपाताला परवानगी आहे. मात्र त्यानंतर गर्भपात करायचा असल्यास उच्च न्यायालयाची परवानगी अनिवार्य आहे. त्यामुळेच या मुलीने वडिलांच्या माध्यमातून याचिका करत गर्भपातास परवानगी देण्याची मागणी केली होती. ही मुलगी बलात्कारातून गर्भवती राहिली होती. या गर्भारपणामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे, असे सांगत तिने गर्भपातास परवानगी मागितली होती. न्यायालयाने तिच्या याचिकेची दखल घेत केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे तसेच या क्षणी तिचा गर्भपात शक्य आहे का, तो केल्यास तिच्या जिवाला काही धोका नाही ना, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय अहवाल सादर करताना गर्भपात न करण्याचा सल्ला दिला होता. या मुलीने बाळाला जन्म दिल्यास ते सुदृढ असेल. शिवाय तिला हे बाळ नको असल्यास त्याला दत्तक देता येऊ शकते. परंतु याचिकाकर्त्यां मुलीचे मानसिक समुपदेशन केल्यास ती या बाळाचे संगोपन करण्यास, त्याला वाढवण्यासाठी समर्थ आहे, असेही डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात म्हटले होते.

न्यायालयाचे स्पष्टीकरण..

या मुलीवर बलात्कारामुळे गर्भारपण लादण्यात आले आहे. परिणामी तिला गर्भपातास नकार देण्यात आला तर तिच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत या मुलीला २५व्या आठवडय़ात गर्भपातास न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने परवानगी दिली. गर्भपाताच्या वेळी बाळ जिवंत असल्यास आणि याचिकाकर्ते वा तिचे पालक बाळाला स्वीकारण्यास तयार नसतील तर सरकारने या बाळाची जबाबदारी घ्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:16 am

Web Title: permission for abortion in 25th week abn 97
Next Stories
1 मोफत प्रवासापोटी शासनाकडून ९० कोटी रुपयांची एसटीला प्रतीक्षा
2 अकरा देशांच्या व्हिसा प्रक्रियेसाठी निवडक शहरांत कार्यालये
3 नवी मुंबईत दहा दिवस पुन्हा लॉकडाउन; महापालिकेचा निर्णय
Just Now!
X