मुंबई : असंशियत व्यक्तींमधील करोना संसर्गाचे निदान करण्यासाठी प्रतिद्रव्य (अँण्टीजन) चाचण्या करण्याची परवानगी खासगी प्रयोगशाळांना वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे.

अनेक खासगी प्रयोगशाळा या चाचण्या घेऊन बाजारात दाखल झाल्या आहेत. यांच्या दरांवर मात्र सध्या कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे अगदी ६०० ते २ हजार रुपयांपर्यत दर आकारले जात आहेत.

करोना संसर्ग झाल्यास विषाणूशी लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती कार्यरत होऊन प्रतिद्रव्ये तयार होतात. शरीरात या प्रतिद्रव्यांची निर्मिती झाली आहे की नाही, याची पडताळणी या चाचणीद्वारे केली जाते. संसर्ग झाल्यानंतर जवळपास दोन आठवडय़ांनी प्रतिद्रव्यांची निर्मिती होण्यास सुरूवात होते. त्यामुळे रुग्ण निदानासाठी याचा वापर करू नये. करोना रुग्णांच्या संपर्कात असलेले आरोग्य आणि इतर कर्मचारी, रोगप्रतिकारक शक्ती क्षीण असलेले रुग्ण आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रात संसर्ग प्रसाराचे सव्‍‌र्हेक्षण करण्यासाठी या चाचणीचा वापर करावा, असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने चाचणी क्षमता वाढविण्यासाठी खासगी प्रयोगशाळांकरिता प्रतिद्रव्य चाचण्या खुल्या केल्याचे २३ जूनला परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी, महानगरपालिका, नगरपरिषद, धर्मादाय, खासगी रुग्णालये तसेच खासगी प्रयोगशाळांनी या चाचण्यांचा वापर करावा असे या परिपत्रकात नमूद केले आहे. याची माहिती मात्र प्रयोगशाळांनी आयसीएमआरच्या संकेतस्थळावर भरणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

दर निश्चितीसाठी समिती..

सरकारी रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रतिद्रव्य चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समितीची नियुक्ती केली जाईल. अनेक कंपनीचे संच उपलब्ध असल्याने दर्जा आणि किंमतीनुसार कोणत्या कंपनीचे संच खरेदी करावेत याचा निर्णय समिती घेईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

एकावेळी ५० कर्मचाऱ्यांच्या चाचण्या

कोणतीही लक्षणे नसली तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांची चाचण्या करण्याची मुभा खासगी कं पन्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. यात किमान ५० कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करणे आवश्यक असेल. यासाठी संबंधित पालिका आयुक्तांकडे अर्ज सादर करावा. यात चाचणीची पद्धती, प्रयोगशाळा इत्यादी नमूद करावे लागेल. सकारात्मक चाचणी आलेल्यांना नियमावलीनुसार विलगीकरण किंवा उपचारासाठी दाखल होणे बंधनकारक असेल, असे या सूचनेत स्पष्ट केले आहे.

चाचणी दर, नियमावलीबाबत अस्पष्टता

आयसीएमआरने १०० हून अधिक कंपन्यांच्या संचांना (किट) परवानगी दिल्याने अनके खासगी प्रयोगशाळा प्रतिद्रव्य चाचण्यांच्या जाहिराती करत आहेत. यामध्येही आयजी, आयजीएम असे अनेक प्रकार असून याची माहिती, चाचणी दर, चाचणीपश्चातील उपाययोजना, डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता यात दिलेली नाही.