ठाणे, नवी मुंबईत परवानगी मिळूनही प्रयोग बंद

मुंबई : निर्बंध शिथिल झाल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबईमध्ये नाट्यगृहांना परवानगी मिळूनही अद्याप नाटकाचा पडदा उघडलेला नाही. केवळ एकाच जिल्ह्याात नाट्यप्रयोग करणे हे नाटकाच्या अर्थकारणाला पेलणारे नसल्याने किमान ठाण्यासह मुंबई आणि पुण्यामध्ये नाट्यगृहांचे दार कधी खुले होईल, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

करोना संसर्गाच्या पंचस्तरीय रचनेत ठाणे आणि नवी मुंबई दुसऱ्या स्तरावर असताना निर्बंध अधिक शिथिल करण्यात आले. यामध्ये नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर किमान ठाण्यात तरी नाट्यप्रयोग होईल अशी आशा नाट्यरसिकांना होती, परंतु परवानगी मिळून दोन आठवडे झाले तरी अद्याप नाट्यसृष्टीत कोणतीही हालचाल पाहायला मिळत नाही.

‘नाटकाचे गणित प्रयोगांवर अवलंबून असते. प्रत्येकच प्रयोग हाउसफुल्ल होतो असे नाही, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा प्रतिसाद मिळतो. पण त्यातूनच समतोल साधून नाटकाचा खर्च भरून निघत असतो. एकाच शहरात नाटक होत असेल तर ते वारंवार पाहायला कोण जाणार, म्हणजे प्रेक्षकांअभावी पुन्हा प्रयोग थांबवावे लागतील. त्यापेक्षा आणखी काही जिल्ह्यामध्ये परवानगी मिळाली तर दिलासा मिळेल,’ असे निर्माते प्रशांत दामले यांनी सांगितले.

‘नाटकासाठी मुंबईत प्रयोग होणे महत्त्वाचे आहे. कारण मुंबईत  चार ठिकाणी नाटक करता येते. म्हणजे जाहिरात देताना एकाच जाहिरातीत आपण चार प्रयोगांचा तपशील देतो.  त्यात ठाण्याचाही उल्लेख असतो. आता हजारो रुपये खर्च करून निर्मात्यांना के वळ एका प्रयोगाची जाहिरात देणे परवडणारे नाही,’ असा मुद्दा निर्माते दिलीप जाधव यांनी अधोरेखित केला.

पाच वर्षे सवलतींची मागणी

‘नाट्यप्रयोग सुरू करण्यासाठी सरकारने दिलेल्या विविध सवलती जूनअखेरीस संपणार आहेत. आता पुन्हा नाटक सुरू करताना पुन्हा सवलतीची सगळी प्रक्रिया पार पाडावी लागेल. एकाच गोष्टीची सतत मागणी करण्यापेक्षा किमान पाच वर्षांसाठी सरकारने नाट्यगृहांच्या भाड्यात सवलती द्याव्यात,’ अशी मागणी नाट्यनिर्मात्यांनी केली आहे.  गेल्या शिथिलीकरणात ४ ते ५ लाख रुपये खर्च करून नाटक पुन्हा उभे केले, आता पुन्हा ते धाडस करणे शक्य नाही. शिवाय तिसऱ्या लाटेचे संकट समोर आहे. त्यामुळे जोवर महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नाटक सुरू होत नाही तोवर नाटकाचा पडदा उघडणे कठीण आहे, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.