न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन पालिकेने गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर मंडप उभारण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे मंडप परवानगी देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पालिका कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पुढील तीन-चार दिवसांमध्ये अर्ज सादर केलेल्या मंडळांना मंडप परवानगी देण्यात येईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

पालिकेने पादचारी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असे मंडप उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा पालिका आणि अग्निशमन दलाने रस्त्यांवरील मंडपांना परवानगी देण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. तसेच यंदा प्रथमच मंडळांना मंडप परवानगी ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन पद्धतीने पालिकेकडे अर्ज करावा लागत आहे. त्यावरून बराच गोंधळ उडाला आहे.

मंडप परवानगीसंदर्भात गुरुवारी महापौरांच्या दालनात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त नरेंद्र बर्डे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, लीलाधर डाके आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मंडप परवानगीसाठी मंडळांना ऑनलाइन अर्ज करता यावा आणि त्यांना परवानगी देता यावी यासाठी सुट्टीच्या काळात पालिका कार्यलय सुरू ठेवण्यात येणार आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी देण्यात येईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आतापर्यंत ११३२ मंडळांनी मंडप उभारणीसाठी पालिकेकडे ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यापैकी ५२७ मंडळांना मंडप परवानगी देण्यात आली आहे, तर १८३ मंडळांनी अद्याप शुल्क भरलेले नाही. शुल्क भरताच त्यांनाही मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येईल. उर्वरित मंडळांचे अर्ज स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ‘ना हरकती’साठी सादर करण्यात आले आहेत. या यंत्रणांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर त्यांना मंडपासाठी परवानगी देण्यात येईल.