19 September 2020

News Flash

सेव्हन हिल्स रुग्णालयात चित्रीकरणास परवानगी

मालमत्ता कर थकवण्यापाठोपाठ नवा वाद उद्भवण्याची चिन्हे

मालमत्ता कर थकवण्यापाठोपाठ नवा वाद उद्भवण्याची चिन्हे

प्रसाद रावकर, मुंबई

मालमत्ता कर थकविल्यामुळे आणि गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार करण्यात येत नसल्यामुळे वादग्रस्त ठरलेले अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय आता नव्या वादात सापडण्याची चिन्हे आहेत. रुग्णालयातील काही भागांमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास पालिकेने परवानगी सेवन हिल्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिली आहे.

गरजू रुग्णांना कमी मोबदल्यात चांगली वैद्यकीय सेवा देण्याच्या अटीवर पालिकेने सेव्हन हिल्सला रुग्णालय उभारण्यासाठी मरोळ येथील आपला भूखंड दिला, मात्र रुग्णालयाने ही अट धाब्यावर बसवली. त्यामुळे रुग्णालय ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी पालिकेकडे केली. दरम्यानच्या काळात रुग्णालयाने मालमत्ता कराची रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा केली नाही. त्यामुळे पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने रुग्णालयाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. हा वाद आता न्यायप्रविष्ट आहे. त्यात आता हे रुग्णालय परदेशातील कंपनीला चालविण्यास देण्याच्या हालचाली प्रशासन पातळीवर सुरू आहेत.

दरम्यान रुग्णालयाच्या काही भागांत ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज कंपनीने पालिकेच्या ‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाकडे केला होता. रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळ तळमजल्यावरील अपघात विभागासमोर आणि अन्य काही भागांत चित्रीकरणासाठी परवानगी मागण्यात आली होती. चित्रीकरण शुक्रवार १ ते रविवार ३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या संदर्भात बोलण्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र, चित्रीकरणाचा भाग रुग्णालय इमारतीच्या खासगी परिसरात आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास होण्याची शक्यता नाही. रुग्णालयाच्या विशेष अधिकाऱ्यानेही ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे पालिकेच्या ‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाने या रुग्णालयाच्या आवारात चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी दिल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

काही मजल्यांना परवानगी नाही

‘‘रुग्णालयाच्या काही मजल्यांना पालिकेच्याच इमारत आणि प्रस्ताव या विभागाकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही मिळालेले नाही. असे असताना तेथे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कशी काय परवानगी देण्यात आली, असा प्रश्न करत स्थानिक समाजसेवक अझिज अमरेलीवाला यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात आपण पालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 12:32 am

Web Title: permission for video shooting at seven hills hospital
Next Stories
1 ४०० हून अधिक दुर्मीळ गाडय़ांचे मुंबईत दर्शन
2 पतीच्या वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
3 प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
Just Now!
X