काळ्या यादीतील कंत्राटदारालाही कामाचा नैवेद्य!
प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास एप्रिल-मे महिना उजाडणार हे स्पष्ट दिसत असतानाही रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या ६२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. शिवसेनेने मनसे आणि भाजप गटनेत्यांचा विरोध तर डावललाच; शिवाय काळ्या यादीत असलेल्या मे. आर. पी. एस. (शहा) या कंत्राटदारालाही यापैकी एक काम देण्यात आले आहे.
मुंबई शहर व उपनगरांतील एकूण १३५ रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्याचा ६२१ कोटी, ३५ लाख, १६ हजार ८३१ रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला. प्रत्येक प्रभागात एकच कंत्राटदार नेमण्यात यावा. चार-चार कंत्राटदार नेमण्यात येऊ नयेत. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होईल, असे सांगत मनसे गटनेते दिलीप लांडे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. तसेच सुधारित प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली. तर, विविध प्राधिकरणांकडून रस्त्यांवर होणारी खोदकामे लक्षात घेऊन त्या प्राधिकरणांशी चर्चा करण्यात यावी. त्यानंतर कामे करायची आहेत, त्या ठिकाणी भेट द्यावी, अशी मागणी भाजप गटनेते दिलीप पटेल यांनी केली. ही पाहणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवावा, असेही ते म्हणाले.
मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चर्चा घडवून आणली. चर्चेअंती संयुक्त भागीदार कंत्राटदार मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट्स, मे. महावीर रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मे. आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि मे. प्रीती कन्स्ट्रक्शन्स यांना हे कंत्राट देण्यात आले.