शैलजा तिवले

करोनासाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमियोपॅथी औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी नोंदणी करण्याची परवानगी मुंबईतील एका डॉक्टरला केंद्रीय होमियोपॅथी अनुसंधान परिषदेने दिली असली, तरी रुग्णालये, एथिकल कमिटीच्या परवानगी मिळविण्यात अडचणी येत असल्याचे या डॉक्टरचे म्हणणे आहे.

मालेगावहून धुळ्याला परतलेल्या एसआरपीएफच्या तीन तुकडय़ांपैकी एका तुकडीतील जवानांना मुंबईतील श्वसनविकारतज्ज्ञ आणि होमियोपॅथी डॉ. जसवंत सिंग यांनी १५ दिवसांसाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ हे प्रतिबंधात्मक औषध दिले होते. यातील केवळ एकाच जवानाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर इतर दोन तुकडय़ांमधील २५ हून अधिक जवानांना संसर्ग झाल्याचे आढळले.  सध्या वैद्यकीय निकषांवर नाही, परंतु प्राथमिक पातळीवर तरी औषधांचा परिणाम योग्य रीतीने होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे औषध प्रतिबंधात्मक उपायांसह प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांमध्येही प्रभावीपणे काम करू शकेल, असा दावा डॉ. सिंग यांनी केला आहे. यापुढे जाऊन दीपगंगा रिसर्च फाऊंडेशनकडून औषधाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी डॉ. सिंग यांनी मागणी केली होती. त्यानुसार नोंदणी करण्याची परवानगी डॉ. सिंग यांना केंद्रीय होमियोपॅथी अनुसंधान परिषदेने दिली आहे. मात्र यासाठी रुग्णालय आणि त्यातील एथिकल कमिटीची परवानगी आणि औषधाबाबत झालेले संशोधन सादर करण्यास सांगितले आहे.

मुंबईतील अनेक रुग्णालयांसोबत बोलणी सुरू आहेत. परंतु इतर पॅथीवर विश्वास नसलेल्या एथिकल कमिटीकडून मात्र प्रतिसाद मिळत नाही. विज्ञानाच्या मापदंडावर या औषधाचा संशोधनात्मक अभ्यास सादर करणे अवघड आहे. त्यामुळे संशोधन करण्याची परवानगी मिळणार असली तरी त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत असून सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. प्रशासनाने सकारात्मकपणे ही प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केल्यास चाचण्या लवकरात लवकर करणे शक्य होईल, असे डॉ. सिंग व्यक्त केले आहे.

यासंबंधी राज्यातील आयुष विभागाशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकलेला नाही. होमियोपॅथीच्या औषधांबाबत आपला काही अभ्यास नसल्याने याबाबत सांगणे अवघड असल्याचे संसगर्जन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

‘दुष्परिणाम नाहीत’ : होमियोपॅथीच्या या औषधांचे दुष्परिणाम नाहीत असा उल्लेख करत आयुष मंत्रालयाने याच्या वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे अ‍ॅलोपॅथी औषधांसोबत हे औषध सुरू करण्यात कोणताही धोका नाही. होमियोपॅथी औषध दिल्याने अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांमध्ये अडथळे येतात, असे तरी आत्तापर्यंतच्या अभ्यासांमधून दिसून आलेले नाही. या औषधाविषयीचा संशोधनात्मक अभ्यास संबंधितांनी सादर करावा, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल यांनी व्यक्त के ले.

औषध काम कसे करते?

अर्सेनिक अल्बम हे मूलद्रव्य असून पाण्यासोबत ३० वेळा मिश्रण करून सौम्य केलेले असते. मूळ द्रव्याचे अतिशय सूक्ष्मकण या द्रव्यात असतात. साबुदाण्यासारख्या पांढऱ्या गोळ्यांमधून हे द्रव्य जिभेवर पसरते. डायनॅमिक ऊर्जेची निर्मिती होऊन त्याद्वारे ते धमन्या आणि रक्तामध्ये प्रवेश करून पेशीपर्यंत पोहचते. शरीरातील पेशींना चालना देऊन पेशींची कार्यक्षमता वाढविते. कार्यक्षम झालेल्या पेशी विषाणूंशी लढा देण्यास पुन्हा सक्षम होतात. करोनाबाधितांमध्ये कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या किंवा लगेचच बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा गंभीर प्रकृती होणाऱ्या २० टक्के व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या औषधाची अधिक आवश्यकता असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.