राज्यातील नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक नेत्यांचा करिश्माही बराच महत्त्वाचा ठरला आहे. स्थानिक नेतृत्व भक्कम असल्यास त्याचा निवडणुकीत फायदा होतो हे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

दोनच दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये भाजपला ९५ पैकी ६१ जागा मिळाल्या. भाजपच्या या यशाचे शिल्पकार स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे ठरले. मीरा-भाईंदर शहरात जैन, गुजराती, मारवाडी समाजाचे मतदार जास्त असल्याने भाजपने मेहता यांना ताकद दिली. माजी महापौर असलेले मेहता हे आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने भाजपने दहा वर्षांपूर्वी त्यांना गळाला लावले. भाजपचा हा प्रयोग यशस्वी ठरला. मेहता यांची प्रतिमा वादग्रस्त असली तरी स्थानिक पातळीवर ते लोकप्रिय आहेत. जैन, गुजराती, मारवाडी समाजात त्यांना चांगला जनाधार आहे. त्याचा भाजपला निवडणुकीत फायदा झाला. महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाने मेहता यांच्या कलाने घेतले होते.

अलीकडेच झालेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. काँग्रेसमध्ये असताना प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली होती. आता महानगरपालिका झाल्यावर ठाकूर भाजपमध्ये गेल्यावर भाजपला कौल मिळाला. त्याआधी लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांच्यावर सारी जबाबदारी सोपविली होती. काँग्रेसच्या ताब्यातील लातूर जिल्हा परिषदेपाठोपाठ महानगरपालिका जिंकून देण्याची कामगिरी संभाजीरावांनी केली. संभाजी निलंगेकर-पाटील यांनी गेल्या वर्षभरात मंत्रिपदाचा उपयोग करीत लातूर जिल्ह्य़ात भाजपची चांगली पकड बसविली. लातूरमध्ये संभाजी निलंगेकर-पाटील आणि माजी मंत्री अमित देशमुख या दोन तरुण नेत्यांमध्ये स्पर्धा होती. भाजपला मिळालेल्या बहुमतामुळे निलंगेकर यांनी अमित देशमुखांवर मात केली.

दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. काँग्रेसने महापौर रशिद खान आणि त्यांचे आमदार पुत्र आसिफ शेख यांच्याकडे सारी सूत्रे सोपविली होती. स्थानिक पातळीवर शेख पिता-पुत्र यांची चांगली ताकद आहे. परभणी महानगरपालिकेत काँग्रेसला सत्ता मिळाली. काँग्रेसच्या प्रचाराची सारी सूत्रे माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्याकडे होती. वरपूडकर यांच्या नेतृत्वाचा काँग्रेसला फायदा झाला. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला सत्ता मिळण्यात स्थानिक नेते आणि राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे श्रेय अधिक आहे. भिवंडी-निजामपुरा महानगरपालिकेत काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी स्थानिक पातळीवर पक्षाकडे कोणा एकाकडे नेतृत्व नव्हते. भिवंडीत भाजपने आव्हान उभे केल्याने अल्पसंख्याक समाजात त्याची प्रतिक्रिया उमटली. अल्पसंख्याक समाजाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. भिंवडीचे महापौर जावेद दळवी हे काँग्रेसचे जुनेजाणते नेते आहेत.

मीरा-भाईंदर, लातूर, चंद्रपूर, पनवेल, परभणी, मालेगाव या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांच्या प्रतिमांचा राजकीय पक्षांना फायदा झाला आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचे नेतृत्व भक्कम असल्यास त्याचा फायदा होतो, असे निरीक्षण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नोंदविले.

बारामती म्हणजे शरद पवार असे समीकरण तयार झाले होते. विलासराव देशमुख (लातूर), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), नारायण राणे (सिंधुदुर्ग), गणेश नाईक (नवी मुंबई) अशा जहागिऱ्या तयार झाल्या होत्या. वर्षांनुवर्षे या नेत्यांचा या शहरांवर पगडा राहिला. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी म्हणजे नागपूर, एकनाथ शिंदे (ठाणे), हितेंद्र ठाकूर (वसई-विरार) अशी नव्याने ओळख निर्माण झाली.

राजकीय पक्ष एका नेत्याचे प्रस्थ वाढणार नाही याची खबरदारी घेतात. त्यातून प्रस्थापित किंवा जनाधार असलेल्या नेत्यांचे पंख कापण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न होतात. काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्याला जास्त मोठे होऊ दिले जात नाही. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे नारायण राणे किंवा आंध्र प्रदेशात माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांचे देता येईल. शिवसेनेत स्थानिक पातळीवर पूर्वीच्या काळी नेत्यांना मुक्तवाव दिला जात असे. कोकणात नारायण राणे, ठाण्यात आनंद दिघे, नवी मुंबईत गणेश नाईक अशा नेत्यांच्या जहागिऱ्या तयार झाल्या होत्या. नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यावर कोकणात मधल्या काळात शिवसेनेची ताकद क्षीण झाली होती. अर्थात, नंतरच्या काळात शिवसेना पुन्हा कोकणात नव्याने उभी राहिली. गणेश नाईक यांनी बंडाचे निशाण फडकविल्यावर नवी मुंबईत शिवसेना कमजोर झाली होती. भाजपने मात्र सत्तेचे गणित जुळण्याकरिता स्थानिक नेत्यांना ताकद दिली आहे.

मंत्रिपद कोणाला?

भाजपला महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देणाऱ्या पनवेलचे प्रशांत ठाकूर आणि मीरा-भाईंदरचे नरेंद्र मेहता यांना राज्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. कोकणात पनवेलच्या प्रशांत ठाकूर यांचा अपवाद वगळता भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळेच ठाकूर यांना राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली जाते. मात्र बाहेरच्या पक्षांमधून आलेल्या नेत्यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या मंत्रिपदावर गडांतर आल्यास नरेंद्र मेहता यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जाते. लातूरमध्ये काँग्रेसचे प्रस्थ मोडून भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या संभाजी निलंगेकर-पाटील यांना चांगल्या खात्याचे वेध लागले आहेत.