‘नोकरीच्या बाजारात यशस्वी होण्यासाठी आपण घेतलेल्या पदवीबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचाही कस लागत असतो. वयाच्या १७ ते २३ या सहा वर्षांच्या टप्प्यात व्यक्तिमत्त्व फुलत असते. त्यामुळे या सहा वर्षांत आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करा. पुढची ६० ते ७० वर्षे आनंदात घालवण्यासाठी हा काळ कष्ट करून कारणी लावायला हवा,’ असा मोलाचा सल्ला राज्याच्या ‘शालेय शिक्षण विभागा’च्या सचिव अश्विनी भिडे यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’च्या ‘मार्ग यशाचा’ या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिला.
‘लोकसत्ता’च्या वतीने प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सुरू झालेल्या ‘मार्ग यशाचा’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन अश्विनी भिडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आपल्या सुमारे पाऊण तासाच्या भाषणात भिडे यांनी आपल्या करिअरचा धावता आढावा घेतला. कोल्हापूरच्या जयसिंगपूर या लहानशा गावातील मराठी माध्यमाच्या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भिडे यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करायचे निश्चित केले. ‘आयएएस’ होऊन हा मार्ग सुफळ संपूर्ण करेपर्यंत आलेले अनेक अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निवडलेल्या मार्गावर यश कसे मिळवावे यासाठीच्या महत्त्वाच्या युक्त्याही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
‘आमच्या वेळी करिअरचे सरधोपट मार्ग होते. पण, जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच संधींची उपलब्धताही वाढली आहे. त्यातील आपल्यासाठी नेमके काय निवडायचे हे प्रत्येकाने स्वत:च ठरविले पाहिजे. माहितीच्या स्फोटामुळे मुलांसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते त्यांचे त्यांना शोधू द्या. सरधोपट मार्ग निवडू नका,’ असा सल्ला त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.
‘अमुक एका शाखेत प्रवेश घेतला म्हणजे आपण त्याच्याशी बांधलो गेलो असे नाही. आज कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला करिअरचा मार्ग बदलता येतो,’ याची सोदाहरण जाणीव त्यांनी करून दिली. तसेच, ‘जो मार्ग निवडाल तो डोळसपणे, पूर्वग्रह न ठेवता निवडा. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यात कौशल्य आत्मसात करा. तर तुमची निवड निश्चितपणे योग्य ठरेल,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागवला. ‘करिअरमध्ये यश मिळवायचे तर कष्टाशिवाय पर्याय नाही,’ हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. ‘शॉर्टकट’ टिकत नाहीत. जे अस्सल असते तेच टिकते,’ याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी ‘करिअर कसे निवडायचे’ यावर मोलाचे मार्गदर्शन केले. ‘मुलांना यशाचा मार्ग कुठेही आणि कधीही सापडू शकतो. त्यासाठी त्यांच्यात असलेल्या गुणांचा पालकांनी सतत शोध घ्यायला हवा. तसेच, यशाबरोबरच अपयशातही पालकांनी मुलांची साथ सोडता कामा नये,’ या तीन महत्त्वाच्या गोष्टींवर भर देत डॉ. शेट्टी यांनी विद्यार्थी-पालकांच्या मनातील गोंधळ दूर करण्यास मदत केली. अभ्यासाबरोबरच परिणामकारक  संभाषण, वेळेचे व्यवस्थापन, भाषांचे महत्त्व आदी ‘सॉफ्ट स्कील्स’ करिअर घडविताना किती आवश्यक असतात, याची जाणीव ‘सॉफ्ट स्कील’ प्रशिक्षक गौरी खेर यांनी करून दिली. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही कौशल्ये मूलत: असतातच. केवळ ती विकसित करण्याची गरज आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.
*या कार्यक्रमाच्या ठिकाणी मांडण्यात आलेले शैक्षणिक संस्थांचे प्रदर्शन हे सर्वासाठी खुले असून विद्यार्थी आणि पालक सकाळी ११ ते सायं. ६ या वेळात या प्रदर्शनाला भेट देऊ शकतील.
*ज्या विद्यार्थी आणि पालकांकडे शुक्रवार ३० मे रोजीच्या प्रवेशिका आहेत त्यांनी सभागृहावर सकाळी ९.३० वा. पोहचावे.
सहभागी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
करिअर निवडीचा मार्ग गवसला..
‘मार्ग यशाचा’साठी गुरुवारी सकाळी ९.००पासूनच विद्यार्थी आणि पालकांनी रवींद्र नाटय़ मंदिरच्या बाहेर रांग लावली होती. १०.०० पासून प्रवेश देण्यास सुरुवात झाली. प्रथम प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तेथे विविध संस्था आणि त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती मिळवली. यांनतर उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन मार्गदर्शन कधी सुरू होत आहे, याची उत्सुकता सर्वाना लागली होती. १०.३०च्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन होऊ लागले.
शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी उद्घाटनाच्या भाषणात मार्गदर्शन करताना त्यांचा सनदी अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या प्रत्येक वक्त्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून ऐकले. तसेच प्रश्न विचारून शंकानिरसनही करून घेतले.
प्रश्नांची सरबत्ती : मार्गदर्शकांना शंका विचारण्याची विद्यार्थ्यांना अगदी घाई झाली होती. स्वाभाविकच गौरी खेर यांच्यासोबतचा प्रश्नोत्तरांचा तास चांगलाच रंगला. विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल्सविषयी अनेक प्रश्न विचारत मार्गदर्शन मागितले. दुसऱ्या सत्रात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची माहिती देण्यासाठी आलेल्या स्नेहल महाडिक आणि मुग्धा शेटय़े यांच्यावरही विद्यार्थ्यांनी करिअर विषयक प्रश्नांची सरबत्ती केली.
‘आतला आवाज’ महत्त्वाचा
कोर्स निवडणे आणि करिअर घडविणे यात फरक आहे. हे दोन वेगवेगळे विचार असून त्यांचा त्याच पद्धतीने विचार व्हायला हवा. करिअरमध्ये एकच एक पर्याय ठेवून चालत नाही. काही विद्यार्थ्यांचा ठरावीक महाविद्यालयाचा आग्रह असतो. त्याऐवजी ज्या महाविद्यालयात अभ्यासाव्यतिरिक्त अशैक्षणिक उपक्रम असतात त्यांना प्राधान्य द्यायला हवे.महाविद्यालयात ‘ब्रॅण्डिंग’ असे काही नसते. तुम्ही मुले हीच त्या महाविद्यालयाची ब्रँड असतात. करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी आपला ‘आतला आवाज’ ऐकायला हवा. आपण जे निवडतो त्यात आपल्याला आनंद मिळायला हवा. अपयशातही पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीवर दिलाशाचा हात ठेवणे आवश्यक आहे. त्याच्यातील गुणांचा सतत शोध घेतला पाहिजे. आज संधी अनेक आहेत. कुठल्याही टप्प्यावर त्या निवडता येतात. आयुष्य ही मोठी स्पर्धा आहे. त्यात आपण जिवंत राहणे आवश्यक आहे.
डॉ.हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

हा तर आयुष्यभराचा प्रवास
जागतिकीकरणामुळे काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. आता कामाच्या ठिकाणी ज्येष्ठतेपेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिले जाते. २० वर्षांपूर्वी जे व्यवसाय किंवा संधी नव्हत्या त्या आता निर्माण झाल्या आहेत. तसेच, अनेक गायबही झाल्या आहेत. या नव्या संधी मिळविण्यात सॉफ्ट स्कील महत्त्वाची भूमिका पार पडतात. सॉफ्ट स्कील या ‘लाईफ स्कील्स’ आहेत. त्या आठ तासात शिकता येत नाहीत. त्यासाठी वर्षांनुवर्षे पद्धतशीरपणे प्रयत्न करावा लागतो. तो आयुष्यभराचा प्रवास असतो. महाविद्यालयांमध्ये सॉफ्ट स्कील्स या केवळ पुस्तकी ज्ञानापुरत्या मर्यादीत राहिल्या आहेत. हा विषय प्रात्यक्षिकांसह शिकविला गेला तर त्याला अर्थ प्राप्त होईल.
गौरी खेर, सॉफ्ट स्कील प्रशिक्षक

स्व-अभ्यासावरच भर हवा
समाजातील एखादा प्रश्न निवडा आणि त्यातून तुमचे करिअर ठरवा. विद्यार्थ्यांना अकरावी बारावीत स्व-अभ्यासावर भर द्यायला हवा. केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवून विकसित न होता त्या जोडीला समाजिक आणि भावनिक दृष्टय़ाही विकसित होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना करिअर निवडीच्यावेळी अनेकजण मार्गदर्शन करतात. हे करत असताना त्यांनी स्वत:च्या करिअरचा मार्ग स्वत:च ठरवावा.
अनुराधा गोरे, ज्येष्ठ शिक्षिका

यशाची ‘पीईएफ’ त्रिसूत्री
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ‘पीईएफ’ ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ‘पी’ म्हणजे ‘पॅशन’. एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास घेऊन त्यात झोकून देऊन काम करणे यश मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा ध्यास घेतल्यानंतर त्यात ई म्हणजे ‘एक्सलन्स’ म्हणजचे प्रावीण्य मिळविणे आवश्यक आहे. तरच त्या ध्यासाचे चीज होईल. त्यानंतर या प्राविण्यातून आपल्याला यश, किर्ती आणि पैसा मिळवायचा असेल तर एफ म्हणजे ‘फोकस्ड’ राहणे अंत्यत महत्त्वाचे आहे.
सुहास शिरासकर, विपणन विभाग प्रमुख, पथिक

करिअरच्या विविध पर्यायांची माहिती देण्यासाठी उपस्थित असलेल्या कौन्सिलर स्नेहल महाडिक यांनी विद्यार्थ्यांना केवळ चांगले गुण मिळाले म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ नका, ते शिक्षण घेण्याची तुमची क्षमता आहे का हे तपासूनच या शाखेची निवड करा, असा सल्ला दिला. त्यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील विविध पर्यायांची ओळख करून दिली. कौन्सिलर मुग्धा शेटय़े यांनी करिअर निवड करताना तुम्ही माहिती गोळा करा. ५-१० पर्याय निवडा. मग या पर्यायांची यादी कमी कमी करत तीन पर्याय अंतिम करा आणि त्याबाबतची माहिती मिळवण्यास सुरुवात करा. त्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधा. त्यांना दैनंदिन कामे करताना येणारे अनुभव आणि आपण मिळवलेली माहिती याचा ताळमेळ साधा आणि मगच करिअरची दिशा अंतिम करा, असा सल्ला दिला. या कार्यक्रमादरम्यान कार्डिओ थायरोसिस व्हॅस्कुलर नर्सिग संस्थेच्या मुख्याध्यापिका जया शिरशेट्टी यांनी नर्सिग अभ्यासक्रमांची माहिती देत हा अभ्यासक्रम समाजसेवेबरोबरच चांगल्या करिअरची कशी संधी देतो हे समजावून सांगितले. पवार पब्लिक स्कूलच्या रसायनशास्त्र विभागच्या प्रमुख राधिका पद्मनाभन यांनीही मार्गदर्शन केले.