भूतदयेपोटी केलेल्या उपद्व्यापांमुळे उपायांऐवजी अपाय होण्याच्या घटना

मुक्या प्राण्यांवर दया करा, रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना मारू नका, अशी आवाहने करत प्राणिसंरक्षणाच्या मोहिमा चालवणाऱ्या काही प्राणिप्रेमींचा अतिउत्साह आणि आंधळे प्रेम मुक्या प्राण्यांच्या जिवावर उठत असल्याचे वास्तव पुढे येत आहे. तर मोठय़ा हौसेने प्राणी पाळणाऱ्यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे प्राण्यांना आराम पडण्याऐवजी अपाय होत असल्याचे प्रकार परळ येथील पशू रुग्णालयात येणाऱ्या प्रकरणांतून समोर आले आहे.

परळ येथील ‘बैलघोडा’ पशू रुग्णालयात दर महिन्याला उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्राण्यांमध्ये ६० ते ७० प्राण्यांची प्रकरणेही चुकीचे उपचार पद्धतीमुळे व चुकीचे खाद्यपदार्थ दिल्यामुळे उद्भवल्या समस्येची असतात, असे या रुग्णालयाचे सचिव के. सी. खन्ना यांनी सांगितले. रस्त्यावरील भटक्या श्वानांच्या आपापसातील भांडणात जखमी झालेल्या ‘जॉनी’ या श्वानाच्या अंगावर किडे निर्माण होऊ लागले. त्या वेळी या परिसरात राहणाऱ्या काही प्राणिप्रेमींनी किडे मारण्यासाठी जॉनीच्या जखमेवर रॉकेल ओतले. परंतु त्यामुळे जॉनीची जखम चिघळली आणि त्याला मूत्रपिंड व यकृताचाही आजार उद्भवला. असाच प्रकार एका मांजरीबाबत घडला. घरात पाळलेली ही मांजर उंचावरून खाली पडली. मांजर उंचावरून पडली तरी ती चार पायांवर व्यवस्थित उभी राहते, या समजुतीतून तिच्या मालकाने तिला केवळ वेदनाशामक गोळ्या दिल्या. परंतु काही आठवडय़ांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधार न झाल्याने रुग्णालयात तपासणी केली असता मांजरीच्या पुढच्या दोन्ही पायांची हाडे मोडल्याचे आढळून आले.

‘प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या प्राणिप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वैद्यकीय प्रशिक्षण न घेता प्राण्यावर विचित्र पद्धतीने उपचार केले जातात. यामुळे अनेक  प्राण्यांना कायमचे अपंगत्व येते. आमच्या रुग्णालयात दर महिन्याला १० ते १२ प्राणी चुकीचे उपचार केल्यामुळे दाखल होतात,’ असे ठाण्यातील ‘पॉझ’ संस्थेचे नीलेश भणंगे यांनी सांगितले. सांताक्रूझ येथील पशुवैद्यकीय डॉ. दिनेश विन्हेरकर यांच्याकडे सुमारे ५० ते ६० टक्के घरगुती उपचारांमुळे गंभीर झालेले प्राणी येतात.

प्रत्येक प्राण्यावर करण्यात येणारे उपचार वेगळे असतात, त्यामुळे प्रथम प्राण्यांची तपासणी केल्यानंतरच उपचार केले जावे ही प्राणिप्रेमींची जबाबदारी आहे.

भटक्या श्वानांना तर एका वेळी अनेक प्राणिमित्र उपचार करतात, खायलाही देतात. आणि अनेकदा हे प्राणिमित्र एकमेकांना ओळखतही नसतात. यामुळे या प्राण्यांवर किती वेळा आणि कुठले उपचार केले जात आहे, याबद्दल माहिती नसते, असे डॉ. विन्हेरकर यांनी या वेळी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

आहारातही मानवी मनमानी

काही वर्षांपूर्वी मुलुंड येथील बिजली नावाच्या हत्तिणीला वडापाव, भजीपाव असे पदार्थ खायला दिले जात होते. त्यात वजन वाढल्यानंतर तिला चार पायांवर उभे राहणेही तिला शक्य झाले नाही आणि तिचा जीव गेला. अनेकदा या प्राण्यांना घरात तयार केलेले मसालेदार पदार्थ खाऊ घातले जाते, तर रात्री उरलेल्या चपात्या दुसऱ्या दिवशी गायी, बैलांना दिल्या जातात. प्राण्यांना मसालेदार, तेलकट, तूपकट, गोड अशा प्रकारचे पदार्थ खायला देऊ नये. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.