शीना बोरा हत्याकांड प्रकरणात पीटर मुखर्जीचा दावा

शीना बोरा हिच्या अपहरणामागे, ती कायमची बेपत्ता होण्यामागे आपला हात असल्याचा खटल्यातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी हिने केलेला आरोप हा स्वत:ला पीडित दाखवण्याचा तसेच आपली बदनामी करणारा आहे, असा दावा सहआरोपी पीटर मुखर्जीने केला आहे. इंद्राणीच्या आरोपांना उत्तरादाखल पीटर याने हा प्रत्यारोप केला आहे.

शीनाच्या अपहरणास, ती कायमची बेपत्ता होण्यास आपण नाही तर पीटर आणि खटल्यात माफीचा साक्षीदार बनलेला त्याचा माजी चालक श्यामवर राय जबाबदार असल्याचा आरोप करीत इंद्राणीने प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे, तर शीनाची हत्या आपण केल्याचे भासवणारे पुरावेही पीटरने सादर करून या प्रकरणी गोवल्याचा दावाही तिने विशेष सीबीआय न्यायालयात याबाबत केलेल्या अर्जाद्वारे केला होता.

त्याला पीटरने उत्तर देत इंद्राणीने केलेल्या आरोपांचे खंडन केले. इंद्राणीचे हे आरोप खोटे असून ते कुहेतूने आणि आपली प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने केलेले आहेत. स्वत:ची या प्रकरणातून सुटका करण्यासाठी विशेषत: स्वत:ला पीडित दाखवण्यासाठी तिचा आटापिटा सुरू आहे. त्यातूनच तिने हे आरोप केल्याचा प्रत्यारोपही पीटरने केला आहे. उलट इंद्राणी हिनेच शीनाचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याचे ठोस पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावाही पीटरने केला आहे.

मात्र इंद्राणीने केलेला अर्ज भारतीय पुरावे कायद्याच्या कलम ३०नुसार विचारात घेतला जाऊ शकतो का, अशी विचारणा विशेष सीबीआयने न्यायालयाने इंद्राणी आणि पीटरच्या वकिलांकडे केली. या कलमानुसार आरोपीचा कबुलीजबाब केवळ त्याच्याच नव्हे तर सहआरोपींच्या खटल्यावरही परिणाम करणारा असतो.