शीना बोरा हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून स्टार इंडियाचे माजी सीईओ आणि इंद्राणी मुखर्जीचे पती पीटर मुखर्जी यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने पीटर मुखर्जी यांना गुरूवारी अटक केल्यानंतर आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने  पीटर मुखर्जी यांना २३ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. शिवाय, इंद्राणी मुखर्जी, तिचे दुसरे पती संजीव खन्ना आणि तिचा वाहनचालक श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पीटर मुखर्जी यांचाही या हत्याप्रकरणात इंद्राणी, संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांच्या इतकाच सहभाग असल्याचा दावा यावेळी सीबीआयने न्यायालयासमोर केला. तसेच इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्याम राय
यांच्याविरोधात नोंद करण्यात आलेला खुनाचा गुन्हा पीटर मुखर्जी यांच्यावरही दाखल करण्यात आल्याचे सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले. कलम ३०२ अंतर्गत पीटर मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पीटर मुखर्जींना झालेली अटक आणि खुनाच्या गुन्ह्याची नोंद यामुळे आता मुंबई पोलिसांच्या तपासाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पीटरला तब्बल दोन-तीन वेळा चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी त्याच्याकडून विसंगत माहिती दिली जात असल्याचेही सांगितले गेले. परंतु पीटरला अटक करण्यात आली नव्हती. सीबीआयच्या चौकशीतही पीटर मुखर्जीच्या जबाबात विसंगती आढळल्यानेच या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली होती.