सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (जेईई) आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा (सीईटी) सुरू झाल्यानंतर अनेक शिकवण्या वर्गानी स्वत:चे महाविद्यालय त्याचबरोबर इतर महाविद्यालयांशी संगनमत करून अकरावी आणि बारावीचे प्रवेश सुरू केले आहेत. त्याचे सध्या सगळीकडे पेव फुटले असून हे बेकायदा असल्याचा आरोप करत हे इंटिग्रेटेड क्लासेस बंद करण्याचे तसेच त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या महाविद्यालयांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’च्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस याचिकेत उपस्थित मुद्दय़ांवर म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कायद्यानुसार महाविद्यालयांना अशा प्रकारे इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस चालवता येत नाहीत. परंतु कायदा धाब्यावर बसवून महाविद्यालयांनी या कोचिंग क्लासेससोबत करार करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारातच हे क्लासेस उपलब्ध करून दिले आहेत. एवढेच नव्हे, तर वर्गात ७५ टक्के हजेरी नसली तरी चालेल, परंतु हे वर्ग सुरू करा, असेही महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक केलेली असतानाही हे सर्रास केले जात आहे. शिवाय या क्लासेससाठी ३ लाख रुपयांहून अधिक पैसे उकळले जात आहेत. विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा म्हणून ही सोय केली जाते असा दावाही महाविद्यालयांकडून केला जात आहे. असे क्लासेस चालवणाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीतही अमूक एका महाविद्यालयाशी करार करण्यात आला असून तेथे प्रवेश घेण्याचे नमूद करण्यात येते. नामांकित महाविद्यालयांचा आणि कोचिंग क्लासेसचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांना असे करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारातच असे क्लासेस चालवणाऱ्या महाविद्यालयांचा परवाना रद्द करण्याचे आणि हे क्लासेस बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

नियम धाब्यावर बसवून करार

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कायद्यानुसार महाविद्यालयांना अशा प्रकारे इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस चालवता येत नाहीत. परंतु कायदा धाब्यावर बसवून महाविद्यालयांनी या कोचिंग क्लासेससोबत करार करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारातच हे क्लासेस उपलब्ध करून दिले आहेत.