मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’दरम्यान सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करावा. तसेच या आंदोलकांसह ‘बंद’ची हाक देणाऱ्या आयोजकांकडून झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या पुढे असे ‘बंद’ पुकारणाऱ्या आयोजकांना मज्जाव करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अरुण बावलकर यांनी अ‍ॅड्. आशीष गिरी यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. कुठलाही राजकीय पक्ष वा संघटनेला ‘बंद’ पुकारण्यास सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाने मज्जाव केलेला आहे. शिवाय ‘बंद’दरम्यान होणाऱ्या नुकसानाची भरपाई वसूल करण्याबाबत उच्च न्यायालयाने २००३ मध्ये नियमावलीही आखून दिलेली आहे. या निकालाचा दाखला देत मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या ‘बंद’दरम्यान जे काही नुकसान झाले त्याची आंदोलनाचे आयोजक आणि संबंधित आंदोलकांकडून वसुली करण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. जमावबंदीची नोटीस काढण्याचे तसेच ‘बंद’ला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनाही नुकसानभरपाईसाठी जबाबदार ठरवण्यात यावे. तसेच १५ ऑगस्ट रोजी ‘बंद’ची हाक देण्यापासून आयोजकांना मज्जाव करण्याची मागणीसुद्धा याचिकाकर्त्यांनी केली आहे. अशा प्रकरणांतील नुकसानभरपाईच्या वसुलीबाबत उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करावी वा राज्य सरकारला अंमलबजावणीचे आदेश द्यावेत. शिवाय या ‘बंद’दरम्यान काही समाजकंटकांकडून नुकसान केले जात असल्याचा वा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये काही समाजकंटक घुसखोरी करून हिंसा करत असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या आरोपांच्या चौकशीही गरज असून तसे आदेश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

मुंबईत शाळा, महाविद्यालये सुरळीत

मुंबई : मराठा आंदोलकांनी गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील बहुतेक शाळा सुरू होत्या. नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळांनी मात्र सुट्टी जाहीर केली होती.मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात झालेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील काही शाळांनी गुरुवारी सुट्टी देण्याचे बुधवारी सायंकाळी जाहीर केले होते. या शाळा गुरुवारी बंद होत्या. मात्र अनेक खासगी शाळा गुरुवारी भरल्या होत्या. मुंबई आणि परिसरात शिक्षण विभागाने अधिकृत सुट्टी जाहीर केली नव्हती. त्यामुळे शासकीय आणि अनुदानित शाळांवर बंदचा फारसा परिणाम दिसला नाही. त्यातच शिक्षक, कर्मचारी संघटनांनीही गुरुवारी त्यांचे आंदोलन स्थगित केले, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे कामकाज सुरळीत झाले. ठाणे, नवी मुंबई या भागांतील शाळा, महाविद्यालये मात्र गुरुवारी बंद होती.

आबिटकर यांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

मुंबई : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेने अनुकूल भूमिका घेतली असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करणे आणि त्यानंतरची वैधानिक प्रक्रिया पार पाडण्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी आंदोलन करण्याची परवानगी आबिटकर यांनी मागितली होती. तसे पत्रही त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवले होते. मात्र आबिटकर यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.