लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉकच्या माध्यमातून लिंगभेद संपविण्याचे लक्ष्य

जगातील पहिला जेंडर न्यूट्रल (लिंग निरपेक्ष) मॉडेल म्हणून ओळखला जाणारा पीटर नित्का याने मुंबईत सुरू असलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये देशातील पहिले ‘जेंडर न्यूट्रल’ रॅम्पवॉक केले. पीटर स्त्री अणि पुरूष अशा दोघांसाठीच्या वस्त्रप्रावरणांसह मॉडेलिंग करतो.

फॅशन शोच्या रॅम्पवरील मॉडेल म्हटल्यावर डोळ्यापुढे येते सडपातळ, कमनीय शरीरयष्टीच्या तरुणी आणि उंच, भारदस्त शरीरयष्टीचे तरुण. सौंदर्याचे हे साचेबद्ध निकष जाणीवपूर्वक मोडण्याचे प्रयत्न गेल्या दोन-तीन वर्षांत सातत्याने सुरू आहे. वर्षांतून दोन वेळा मुंबईत होणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’दरम्यान मॉडेिलगचे काही वेगळे प्रयोग याच उद्देशातून सुरू असतात. गेल्या वर्षी तृतीयपंथी व्यक्तीला तसेच स्थूल मॉडेल्सना रॅम्पवर उतरवून या फॅशन सोहळ्याने एक वेगळी प्रथा सुरू केली. यंदा त्यापुढची पायरी म्हणून अंजली लामा या ‘ट्रान्सजेंडर’ मॉडेलने रॅम्पवॉक केले. तसेच जगातील पहिला िलग निरपेक्ष मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीटर नित्का याचा रॅम्पवॉकही यंदा गाजला.

मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीक समर/रिसॉर्ट २०१७ मध्ये पीटर दोन डिझायनर्ससाठी रॅम्पवॉक केले. झेक प्रजासत्ताकचा नागरिक असणारा पीटर ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाला की, ‘भारतात रॅम्पवॉक करण्याची माझी पहिलीच वेळ आहे, इथला अनुभव खूप चांगला आहे. भारतीय फॅशन मला मनापासून आवडली. ती युरोपीयन फॅशनपेक्षा खूप वेगळी आहे. या फॅशनमधील रंग खुणावतात. भारतीय डिझायनर्स त्यांचे प्रयोग हे खूप चांगल्या रीतीने लोकांसमोर मांडत आहेत.’

त्याच्या या मॉडेिलगमधली प्रवेशाची कहाणी सांगताना तो म्हणाला, ‘ मला खूप सुरुवातीपासूनच मॉडेिलग क्षेत्रात काम करायचे होते. पण माझी शारीरिक ठेवण आणि उंची मेन्स वेअर सादर करण्यासारखी नाही हे मला माहीत होते. मी बारीक आहे, इतर  पुरुष मॉडेल्स एवढी माझी उंची नाही. त्यामुळे मी काहीसा नाराज होतो. ऑस्ट्रेलियात एका शूट दरम्यान माझी श्रीलंकेच्या एका छायाचित्रकाराशी ओळख झाली आणि त्याने माझे फोटोशूट केले. ते फोटो पाहून मी इतरांपेक्षा काही वेगळा आहे हे माझ्या लक्षात आले. मी ‘जेंडर न्यूट्रल’ आहे हे मला समजले आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी पुरुष व स्त्रिया या दोहोंचेही  कलेक्शन घालून रॅम्प वर चालण्यास सुरुवात केली.’ स्त्री-पुरूष समानतेसाठी मी मुद्दाम असे रॅम्पवॉक करतो. िलगभेद नष्ट करणे आणि िलगसापेक्ष भेदभाव मिटवणे हे माझे लक्ष्य आहे, असे पीटर सांगतो.