25 February 2021

News Flash

नवा इंधन भडका

पेट्रोल शंभरीनजीक, तर विमानाचा इंधनदर ५४ रुपये प्रति लिटर

संग्रहीत

चारचाकी आणि दुचाकींसाठी वापरात येणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती निरंतर सुरू असलेल्या दरवाढीने आकाशाला भिडल्या आहेत. त्या तुलनेत मंगळवारी झालेल्या दरवाढीनंतरही विमानासाठी वापरात येणारे इंधन ‘एटीएफ’ आता देशाच्या बऱ्याच राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलपेक्षा खूपच स्वस्त झाले आहे.

सलग आठव्या दिवशी तेल कंपन्यांकडून झालेल्या दरवाढीने देशाच्या काही भागांत पेट्रोलच्या किमतीने लिटरमागे शंभर रुपयांची वेस गाठली. एटीएफ आणि एलपीजीच्या किमतींचे दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला फेरनिर्धारण केले जाते. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारी झालेल्या एटीएफच्या किमतीत मोठय़ा वाढीनंतर, हे इंधन पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत दोन-तृतीयांश इतके स्वस्त असल्याचे समोर आले. एटीएफच्या किमती मुंबई महानगरात प्रति किलोलिटर ५३,८५६.६५ रुपये, अर्थात लिटरमागे त्या ५३.८५ रुपये अशा झाल्या आहेत, तर महाराष्ट्रातील पेट्रोलची सर्वोच्च विक्री किंमत परभणीमध्ये ९८.२५ रुपये, तर मुंबईत लिटरमागे ९५.७५ रुपये पातळीवर गेली आहे. बरोबरीने डिझेलही राज्यात परभणी सर्वाधिक ८७.८१ रुपये प्रति लिटर किमतीला, तर मुंबईत ८६.७२ रुपये किमतीला विकले जात आहे. एलपीजीच्या किमतीही १४.२ किलोग्रॅम सिलिंडरसाठी मुंबईत ७६९ रुपयांवर गेल्या आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ात एलपीजीच्या किमती ८०० रुपयांपल्याड, तर गडचिरोली, गोंदियांमध्ये ८४० रुपये झाल्या आहेत.

विमान कंपन्यांकडून एकाच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे, परिणामी वितरण व वाहतूक खर्च लक्षणीय प्रमाणात कमी लागणाऱ्या एटीएफच्या किमती या पेट्रोलच्या तुलनेत परंपरेने स्वस्त राहत आल्या असल्या तरी दोहोंच्या किमतीतील इतकी मोठी तफावत पहिल्यांदाच दिसून येत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.

झाले काय? मंगळवारी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर ३० पैसे आणि डिझेलमध्ये ३५ पैशांची वाढ करण्यात आली. याच वेळी तेल कंपन्यांकडून विमानाचे इंधन असलेल्या ‘एटीएफ’च्या किमती ३.६ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या. मुंबईत लिटरमागे पेट्रोलची किंमत ९५.७५ इतकी झाली. तर ‘एटीएफ’चे दर लिटरमागे ५३.८५ इतके होते.

‘एलपीजी’ही महाग..

स्वयंपाकाचा गॅस- एलपीजीच्या किमतीत सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढ करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:31 am

Web Title: petrol price doubles as much as jet fuel abn 97
Next Stories
1 रेल्वे प्रवासात मुंबईकरांचा मुखपट्टीला फाटा
2 चेंबूर परिसरात ‘कडक टाळेबंदी’?
3 मुंबईचे ‘जोखीम विश्लेषण’
Just Now!
X