रसिका मुळ्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएच.डी.च्या बाजारीकरणाचे विद्रूप रूप उघड; देशभरात संस्था उभारून विद्यार्थ्यांसमोर आमिष

देशातील विद्यापीठांमधील संशोधनाचा दर्जा आणि सर्वोच्च पदवी मानल्या जाणाऱ्या पीएच.डी.च्या बाजारीकरणाचे विद्रूप रूप नव्याने समोर आले आहे. पीएच.डी.साठी प्रवेशापासून ते आयता प्रबंध विद्यार्थ्यांला उपलब्ध करून देण्याचा धंदा देशभरात तेजीत असून  या संस्थांनी देशभर शाखा उघडल्या आहेत. गंमत म्हणजे मजकुरातील वाङ्मयचौर्याच्या प्रमाणानुसार प्रबंध आणि शोधनिबंध लेखनाचे दरपत्रकच या संस्थांनी तयार केले आहे.

विद्यार्थ्यांना घरबसल्या, विषयाचा कोणताही अभ्यास न करताही थेट पीएच.डी. मिळवून देण्याचा हा राजरोस प्रकार उघडकीस आला आहे.

एखाद्या विषयात किमान चार ते पाच वर्षे सखोल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांला पीएच.डी. मिळते हा वर्षांनुवर्षे चालत आलेला समज या संस्थांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या बाजारामुळे ‘भोळसट’ ठरला आहे.

पीएच.डी. करण्याचा विचार केल्यानंतर प्रवेश निश्चित होण्यापूर्वी अवघ्या तीन ते चार महिन्यांत विद्यार्थ्यांच्या हाती पूर्ण प्रबंध मिळू शकतो. त्यातील अनुक्रमाणिकेपासून, संदर्भसूचीपर्यंत सर्व घटकांचे लेखन केले जाते. इतकेच नाही तर पीएच.डी.च्या निकषांमधील नामांकित संशोधनपत्रिकांमध्ये छापण्यासाठी शोधनिबंध तयार करून मिळतात, ते नामांकित नियतकालिकांमध्ये छापून आणण्याची हमीदेखील दिली जाते. अशा प्रकारे प्रबंध आणि शोधनिबंधांचा बाजार मांडणाऱ्या ‘शोधइंडियाडॉटकॉम’शी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्या वेळी मिळालेल्या माहितीतून अनेक गैरप्रकार समोर आले आहेत.

वाङ्मयचौर्याच्या प्रमाणानुसार दरपत्रक

शोधनिबंध किंवा प्रबंधातील वाङ्मयचौर्याच्या प्रमाणानुसार या संस्थांनी दरपत्रक निश्चित केले आहे. प्रबंधांत वाङ्मयचोरी असणार हे गृहीत धरूनच दर ठरवण्यात आले आहेत. यातील ‘ज्येन्युईन क्वालिटी’ म्हणजे सर्वोत्तम दर्जाच्या प्रबंधांची किंमत ५५ हजार रुपये आणि त्यात १५ टक्क्यांपर्यंत वाङ्मयचौर्य असेल. ‘गुड क्वालिटी’ म्हणजे साधारण २५ टक्क्यांपर्यंत वाङ्मयचौर्य असलेल्या प्रबंधाची किंमत ४५ हजार रुपये तर ‘नॉर्मल क्वालिटी’ म्हणजे ३५ टक्के वा त्याहून जास्त वाङ्मयचोरी असलेला प्रबंध ३५ हजार रुपयांपर्यंत मिळेल. शोधनिबंधासाठी ३,५०० रुपये, राष्ट्रीय परिषदेसाठीच्या शोधनिबंधासाठी ३ हजार रुपये, तर आंतरराष्ट्रीय परिषदेतील शोधनिबंधासाठी ५ हजार रुपये असे दर आहेत. याशिवाय ‘आयईईई’ किंवा त्या दर्जाच्या संशोधनपत्रिकेतील निबंधाची किंमत ही विषयानुसार ठरवण्यात येईल, असेही जाहिरातीत स्पष्ट केले आहे. जुन्या ग्राहकांसाठी सवलत योजनाही आहेत.

परराज्यातील विद्यापीठांचा आधार..

पीएच.डी.चा प्रवेश झाला असेल तर फक्त लिखाणापुरती मदत, प्रवेश झाला नसेल तर त्यासाठीही आवश्यकतेनुसार मदत केली जात असल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले. संस्थेच्या जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला असता तो दिल्ली येथील क्रमांक असल्याचे समोर आले. मराठी विषयात पीएच.डी. करायची आहे

सांगितल्यानंतर पुण्यातील एका महिलेचा क्रमांक दिल्ली येथील प्रतिनिधीने दिला. त्या वेळी प्रवेश झाला नसेल तर राजस्थान येथील विद्यापीठामध्ये प्रवेश घ्या, दोन-अडीच वर्षांत पीएच.डी. पूर्ण होईल. त्यासाठी तेथे जाण्याचीही आवश्यकता नाही. मुंबई किंवा पुणे विद्यापीठातही पीएच.डी. होऊ शकते. मात्र, त्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो असे या महिलेने सांगितले.

बनवाबनवी कशी चालते?

‘शोधइंडियाडॉटकॉम’ असे संकेतस्थळ आहे. त्यावर या सगळ्या प्रकाराची ढोबळ माहिती मिळते. त्यावरील क्रमांकावर प्रतिनिधी व ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी विद्यार्थी म्हणून संपर्क साधला. महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विषयावर पीएच.डी. करायची आहे. मात्र विषय ठरलेला नाही असे शोधइंडियाच्या प्रतिनिधींना सांगितले. विद्यार्थी म्हणून या सर्व प्रकाराची चौकशी करताना या संस्थांच्या कार्यप्रणालीची माहिती शोधइंडियाच्या प्रतिनिधीने दिली. हे काम फक्त ऑनलाइन चालते. संस्थेचा प्रतिनिधी आणि विद्यार्थी कधीच समोरासमोर येत नाहीत. ठरलेल्या दिवसांनुसार दिलेल्या खात्यावर पैसे जमा झाले की प्रबंध ईमेल किंवा घरपोच मिळतो. ‘हे सर्व नियमाला धरून नाही. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष कुणाला भेटत नाही. दोन किंवा तीन टप्प्यांत आम्ही पैसे घेतो. ते जमा झाले की तुम्हाला प्रबंध मिळेल. प्रबंधासाठी तुम्ही काहीही माहिती, मुद्दे द्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला काही शंका असेल तर दिलेला क्रमांक, ईमेल, चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता. तुमचा प्रबंध कुणी लिहिला हे तुम्हाला कळणार नाही,’ असे शोधइंडियाडॉटकॉमच्या दिल्ली येथील प्रतिनिधीने सांगितले. प्रबंध १५ दिवस ते तीन महिन्यांच्या कालावधीत मिळतो. कमी वाङ्मयचोरी असलेला प्रबंध तीन महिन्या त तर भरपूर मजकूर चोरलेला प्रबंध पंधरा दिवसांत मिळेल अशीही माहिती प्रतिनिधींनी दिली. ‘तुम्हाला ‘कचरा’ हवा असेल तर तो दहा ते पंधरा दिवसांत मिळेल. इतर प्रबंध किंवा गुगलवरून मजकूर घेऊन प्रबंध लिहिला जाईल. वाङ्मयचोरी कमी हवी असल्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यातील मजकुरात १५ टक्क्यांपर्यंत साधम्र्य असेल,’ असे शोधइंडियाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

होतेय काय?

‘शोधइंडियाडॉटकॉम’ या नावाने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आयते शोधनिबंध लिहून देण्यासाठी गुणवत्तेनुसार ३ हजार ते ५५ हजार रुपयांचे दर ठरवून दिले गेले आहेत. हे दरपत्रक काही शैक्षणिक संस्थांच्या चर्चासत्र (सेमिनार्स) आणि कार्यक्रमांमध्येही थेट वाटले जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांसमोर पीएच.डी. सहज मिळवून देण्याचे आमिष ठेवले जात आहे.

संशोधन नियतकालिकांशीही साटेलोटे

बोगस संशोधनपत्रिकांवर नियंत्रण आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘केअर’ या  प्रकल्पांतर्गत शोधपत्रिकांची यादी जाहीर केली. या यादीतील शोधपत्रिकांमधील शोधनिबंधच ग्राह्य़ धरण्यात येतील असेही जाहीर केले. आता या शोधपत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची हमी या संस्था देत आहेत. आजमितीला शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी केअरच्या यादीतील संशोधनपत्रिका प्रसिद्ध करणारी काही प्रकाशने किंवा संस्थांबरोबर संधान बांधले असल्याचा दावा ‘शोधइंडियाडॉटकॉम’ या संकेतस्थळाच्या प्रतिनिधींनी केला. दरम्यान केअरच्या यादीत नसलेल्या संशोधनपत्रिकांमध्ये जुन्या तारखेने शोधनिबंध प्रसिद्ध करण्याचा पर्यायही या प्रतिनिधींनी दिला. आयोगाच्या यादीतील राष्ट्रीय शोधपत्रिकेसाठी निबंध लिहिण्याचा दर आहे ४ हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेसाठी निबंध लिहिण्याचा दर ५ हजार रुपये आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ph d thesis rate card proportion abn
First published on: 18-09-2019 at 01:47 IST