औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तूकला महाविद्यालये तंत्रशिक्षण म्हणूनच गणली जाणार असली तरी यापुढे या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागणार नाही. दोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या स्वायत्त परिषदांची मान्यता पुरेशी ठरणार आहे

देशभरातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करण्याची जबाबदारी परिषदेची असली तरी आता हळूहळू परिषदेच्या कक्षातून अभ्यासक्रम वगळण्यास सुरुवात झाली आहे. औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला या अभ्यासक्रमांचे नियमन एआयसीटीबरोबर त्या विद्याशाखेच्या स्वतंत्र स्वायत्त परिषदा करतात. औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तूकला या दोन विद्याशाखांचे अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारीही अनुक्रमे भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषद आणि वास्तूकला परिषदेकडे आहे. मात्र या महाविद्यालयांना एआयसीटीईची मान्यता घ्यावी लागत होती. अनेक वेळा दोन्ही परिषदांनी दिलेल्या निर्णयामध्ये विसंगती आढळल्यामुळे प्रकरणे न्यायालयापर्यंत जात. आता मात्र विद्याशाखेची स्वायत्त परिषद असलेल्या औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला या अभ्यासक्रमाच्या संस्थांना एआयसीटीईच्या कक्षेतून वगळण्यात आले असून नव्या शैक्षणिक वर्षाच्या नियमावलीत याबाबत तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता या संस्थांना त्यांच्या विद्याशाखेच्या परिषदेची परवानगी घेऊन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. याचबरोबर अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील वास्तूकला विभागही परिषदेच्या अखत्यारीत येणार आहेत.

योजनांसाठी स्वतंत्र अर्ज

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीई अनेक योजना राबवते. विद्याथ्र्यांना दरमहा शिष्यवृत्ती, प्राध्यापकांसाठी संशोधन योजना, अनेक प्रकल्प, स्पर्धा यांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास संस्थेला एआयसीटीईकडे अर्ज करावा लागेल, असे एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.

काय होणार?

अभ्यासक्रमाबरोबर, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, प्राध्यापकांच्या पात्रतेचे निकष, पायाभूत सुविधा अशा बाबींचे नियमन भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषद आणि वास्तूकला परिषद करेल. त्यामुळे यापूर्वी निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणी टळू शकतील. एआयसीटीईचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे आता औषधनिर्माण क्षेत्रात अधिक दर्जेदार शिक्षण देता येईल. काही नव्या गोष्टींचा अवलंब करता येईल. तसेच प्रशासकीय कामकाजही सुलभ होईल, असे मत भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. शैलेंद्र सराफ यांनी व्यक्त केले.