03 June 2020

News Flash

खोटय़ा माहितीमुळे अधिकाऱ्यांची दमछाक!

करोना रुग्ण असल्याच्या केवळ संशयावरून फोन

संग्रहित छायाचित्र

‘करोना’ रुग्णांचा प्रभाग पातळीवर शोध घेण्याचे नेहमीचे ३०पेक्षा अधिक तासांचे कर्तव्य संपवून एक वैद्यकीय अधिकारी घरी आले. तोच त्यांचा मोबाइल वाजला. डॉक्टरसाब, कुरेशीनगर मे एक करोना सस्पेक्ट है..! अन्य व्यक्तीच्या मोबाइलवरून फोन आलेला असल्यामुळे हे वैद्यकीय अधिकारी तात्काळ रवाना झाले. परंतु दोन-तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर प्रत्यक्षात हाती काहीही लागले नाही. त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मात्र चांगलीच दमछाक झाली.

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बनावट माहिती देणाऱ्या फोन कॉल्सनी सध्या हैराण करून सोडले आहे. याबाबत संबंधित तक्रारदारांविरुद्ध पोलीसही काही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अशा बनावट माहितीमुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बराचसा वेळ वाया जात आहे.

या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कथित करोना संशयितांबद्दल स्थानिक दूरध्वनी केंद्रावरून फोन येत असत. सुरुवातीला ते लगेच धाव घ्यायचे. पण ते बनावट कॉल ठरायचे. त्यामुळे यापुढे मोबाइल क्रमांकावरून आलेल्या फोनचीच दखल घ्यायचे, असे त्यांनी ठरवले होते.

कुर्ला येथील कुरेशीनगर परिसरात रात्री १२च्या सुमारास असेच एक अधिकारी पोहोचले. घटनास्थळी १०० ते १५० जणांचा जमाव. मोबाइलवरून तक्रार देणारेही हजर. अखेर पोलीसही आले. ‘सोशल डिस्टन्ससिंग’ची पूर्णपणे ऐशीतैशी. त्यातच एक माजी मंत्री तेथे आले. त्यांनी तेथेच सभा घेतली. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना हा काय प्रकार आहे, म्हणून विचारला.. तर पोलीस म्हणतात, आम्ही काय करणार? हे उत्तर ऐकून त्यालाही गप्प बसण्यावाचून पर्याय उरला नाही.

ज्या दोघांनी मोबाइलवर फोन केला होता, त्यांनी दिलेल्या माहितानुसार शोध घेतला. अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती सापडली नाही. पहाटेचे ३ वाजले होते. फोन करणाऱ्या दोघांनी वैद्यकीय अधिकाऱ्याची माफी मागितली. पोलिसांनी सांगितले की, जाऊ दे साहेब, चांगल्या हेतूनेच त्यांनी कॉल केला असणार. त्यावर तो अधिकारी निरुत्तर झाला. घरी पोहोचायला त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला पहाटेचे ४ वाजले. पुन्हा सकाळच्या डय़ुटीवर त्याला निघायचे होते.

पोलीस म्हणतात, जाऊ द्या ना साहेब!

अशा घटना दररोज घडत आहेत. लोक फोन करतात आणि त्यांना वाटते म्हणून करोना संशयित असल्याचे सांगतात. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे जावेच लागते. प्रत्यक्षात काहीच निष्पन्न होत नाही. आपत्तीविषयक कायद्यानुसार अशी खोटी माहिती देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची तरतूद आहे. परंतु पोलीसही इच्छुक दिसत नाहीत, पण त्यामुळे पालिकेतल्या सर्वच वॉर्डातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मात्र दमछाक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:32 am

Web Title: phone from the mere suspicion that corona is a patient abn 97
Next Stories
1 राज्यभरात भाजीपाला, फळांचा पुरवठा सुरळीत ठेवा
2 राज्यातही आमदार निधीला कात्री
3 जसलोक रुग्णालयातील १२ परिचारिकांना करोना संसर्ग
Just Now!
X