28 October 2020

News Flash

करोना उपचारांत ‘फिजिओथेरपी’ लाभदायी

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या करोनाबाधितांच्या उपचारांदरम्यान आणि बरे झाल्यानंतर पुन्हा दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी फिजिओथेरपी (भौतिकोपचार) फायदेशीर असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

करोनाची तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो, थकवा आलेला असतो. काही रुग्णांमध्ये हालचाल केल्यासही ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे रुग्ण घाबरून हालचालदेखील करत नाहीत. विशेषकरून अतिदक्षता विभागातील, कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्ण बराच काळ पाठीवर पडून असतात. अशा रुग्णांना औषधोपचारासह फिजिओथेरपीची जोड दिल्यास प्रकृतीत सुधारणा होण्यास नक्कीच मदत होते, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

सतत पाठीवर पडून राहण्याचे तोटे असल्याने प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे शास्त्रोक्त व्यायाम आखून दिले जातात. व्यायाम करताना हृदयाची गती, ऑक्सिजनची पातळी यावर लक्ष ठेवले जाते. झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकविल्या जातात. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी सुधारते. जसे की पोटावर झोपविणे (प्रोनिंग). निरीक्षणाखाली योग्यरीतीने ही पद्धती केल्यास ऑक्सिजनची पातळी वाढल्याने बाहेरील ऑक्सिजनची गरज कमी भासते आणि रुग्ण लवकर बरे होऊन घरी जातात, असा अनुभव केईएमच्या फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. सरस्वती अय्यर यांनी सांगितला. केईएममध्ये जूनपासून रुग्णांवर फिजियोथेरपी सुरू केली असून आतापर्यंत हजाराहून अधिक रुग्णांना फिजिओथेरपीचा फायदा झाला आहे.

रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी सहा मिनिटे चालण्याची चाचणी करून शारीरिक क्षमतेचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार व्यायाम ठरविले जातात. रुग्णांची फुप्फुसांची क्षमता कमी झाल्याने घरी कमीत कमी ऑक्सिजन वापरून काम करण्याचे तंत्र, स्नायूंची ताकद वाढविणारे सुरक्षित व्यायाम शिकविले जातात. तसेच अशा रुग्णांसाठी टेलीरिहॅबिलिटेशनची सुविधा केली आहे.  यात कुटुंबाच्या सदस्याच्या मदतीने उपचार घेण्यास मदत होते. यात विविध श्वासाचे व्यायाम, हातापायाच्या शास्त्रोक्त हालचाली यांचा समावेश केलेला आहे. योग्य वेळी फिजिओथेरपी मिळाल्यास रुग्ण अधिकाधिक कार्यक्षम होण्यास मदत होते, असे केईएमच्या फिजिओथेरपी विभागातील डॉक्टरांनी सांगितले.

करोना संसर्गाचा परिणाम प्रामुख्याने फुप्फुसावर होत असून काही रुग्णांमध्ये कायमस्वरूपी राहू शकतो. बरे झालेल्या रुग्णांनाही मोठय़ा प्रमाणात थकवा आल्याने, पायरी चढली तरी धाप लागते. त्यांची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची आहे.

– डॉ. नविता व्यास, सल्लागार, पुनवर्सन विभाग, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 2:05 am

Web Title: physiotherapy is beneficial in corona treatment zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सर्वच बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा!
2 मुंबई पालिकेच्या उत्पन्नात ४१ टक्क्य़ांची घट
3 निर्बंध शिथिल झाल्यानंतर कृषी पर्यटन केंद्रे, रिसॉर्टकडे ओढा
Just Now!
X