अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला महिना उलटत आला, तरी खुन्यांचा सुगावाही लावण्यात अपयशी ठरलेल्या राज्य पोलिसांकडून तपासाची सूत्रे काढून घेऊन ती राष्ट्रीय तपाय यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी मंगळवारी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली.
केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली असून याचिकेवर उद्या, १९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. याचिकेनुसार, दाभोलकर यांना धमक्या येत होत्या याची पोलिसांना माहिती होती. या हत्येप्रकरणी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील हिंदूू गटांचा आणि व्यावसायिक ज्योतिषांचा हात असून त्यांनीच दाभोलकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या कथित आरोपाकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आरोपींचे धागेदोरे लागल्याची वल्गना केली होती. प्रत्यक्षात तपास ‘जैसे थे’च असून आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पण त्यानंतरही राज्य किंवा केंद्र सरकारकडून प्रकरणाचा तपास अन्य यंत्रणेकडे वर्ग करण्यासाठी काहीच केले जात नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. १९९२-९३ सालच्या दंगलींपासून ते मालेगाव स्फोट तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपर्यंतच्या सगळ्या घटनांमागे हिंदू गटांचा हात असल्याचे माहीत असतानाही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात सरकारला नेहमीच अपयश आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.