मेट्रो ७ चे काम सुरु असताना एक पिलर कोसळून एक मजूर जखमी झाला आहे. सुदैवाने मुंबईत मोठी दुर्घटना होता होता राहिली. गोरेगाव ते आरेच्या दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा पिलर कोसळल्याची माहिती समोर येते आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. अंधेरी ते दहिसर प्रकल्पाचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

एकीकडे कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ च्या स्थानकांचे काम सुरू असताना फोर्ट आणि माहिम येथील इमारतींना हादरे बसण्यास सुरूवात झाली आहे. त्याबाबत रहिवाशांनी नाराजीही व्यक्त केली आहे. आता शनिवारी मेट्रो ७ मार्गावरचा पिलर कोसळून एकजण जखमी झाला आहे. भाऊबीज असल्याने आणि दिवाळीची सुटी असल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. जखमी मजुरावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मेट्रो ७ चे काम सुरू असताना पिलर अचानक खाली कोसळला. हा पिलर कोसळण्याच्या काही क्षण आधीच एक बेस्टची बस या रस्त्यावरून गेली आणि काही वाहनेही गेली होती. सुदैवाने या कशावरही हा पिलर कोसळला नाही, तसे घडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. पिलर कोसळल्यानंतर तो पुन्हा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.