आवाज गमवावा लागण्याची भीती टळली

मुंबई : एका दीड वर्षांच्या मुलाने गिळलेली केसांना लावण्याची पिन काढण्यात वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. चार सेंटिमीटर लांबीची पिन अन्ननलिकेत रुतून बसल्याने त्याच्यावर आवाज गमावण्याची वेळ आली होती; परंतु ती काढल्यामुळे हा धोका टळला आहे.

रोनित नावाच्या या मुलाने घरी खेळताना केसांची पिन गिळली. ती घशात अडकल्यामुळे त्याला वेदना होऊ लागल्या आणि उलटीमधून रक्त येऊ लागले. त्याला परळ येथील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या चमूने गुंतागुंतीची एण्डोस्कोपी करून त्याच्या अन्ननलिकेत अडकलेली पिन काढली.

‘मुलाला उपचारासाठी आणले तेव्हा स्थिती अतिशय बिकट होती. एक्स-रे काढला असता कंठामध्ये पिन अडकल्याचे दिसले. पिनचा एक भाग अन्ननलिकेत तर दुसरा स्वरयंत्रात घुसला होता. वेळीच उपचार झाले नसते तर कदाचित त्याला आवाज गमवावा लागला असता,’ असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. प्रमुख निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल नागे, बालरुग्ण नाक-कान-घसातज्ज्ञ डॉ. दिव्या प्रभात आणि डॉ. कार्लटन परेरा, डॉ. बालगोपाल कुरुप, वरिष्ठ बालभूलतज्ज्ञ डॉ. मीलन शहा आणि डॉ. प्रज्ञा सावंत यांनी शस्त्रक्रिया करून ही पिन काढली.