७५ हजार विद्यार्थ्यांतून निवड, पाच लाखांची शिष्यवृत्ती

प्रत्येक दिवसाचे वैशिष्टय़ लक्षात घेऊन त्यानुसार डूडल म्हणजे दर्शनीचित्र झळकावणाऱ्या गुगलने बालदिनाचे औचित्य साधत बुधवारी मुंबईच्या पिंगला राहुल मोरे या विद्यार्थिनीने चितारलेल्या चित्राची डूडल म्हणून निवड केली. तिला पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती गुगलकडून मिळणार आहे.

गुगलच्या भारतीय आवृत्तीने बालदिनानिमित्त ‘डूडल फॉर गुगल’ ही स्पर्धा घेतली. त्यात ‘माझे प्रेरणास्थान’ हा विषय दिला होता. अवकाशाचा दुर्बिणीतून वेध घेणारी मुलगी पिंगलाने या चित्रात रेखाटली आहे. इतकंच नव्हे, तर या अवकाशात आकाशगंगा, ग्रह आणि अवकाशयानांची अशी रचना केली आहे की ज्यातून ‘गुगल’ ही अक्षरेही दृश्यमान व्हावीत!

या स्पर्धेसाठी हजारो चित्रे गुगलकडे आली. विशेष म्हणजे सहभागी मुलांपैकी ५५ टक्के मुले ही महानगरांपलीकडची होती. आलेल्या चित्रांपैकी काही चांगल्या चित्रांची निवड तज्ज्ञांमार्फत करण्यात आली. त्यानंतर या चित्रांचे पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी आणि नववी ते दहावी; असे इयत्तांनुसार पाच गट करण्यात आले. या वयोगटांनुसार चित्रांची पुन्हा छाननी आणि निवड झाली आणि अखेर अंतिम निवडीसाठी ही चित्रे ऑनलाइन झळकवण्यात आली. त्यात सर्वाधिक म्हणजे तीन लाख मते पिंगला हिच्या चित्राला पडली आणि ती विजेती ठरली. पिंगला ही मुंबईच्या जे. बी. वाच्छा हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. अंतराळ संशोधन हा तिच्यासाठी कुतूहलाचा विषय आहे.

विशेष म्हणजे पाचपैकी प्रत्येक गटातील विजेत्यांमध्येही मुंबई, ठाणे, पुणे येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. पहिली-दुसरीच्या गटात ठाणे येथील एमईएस क्रिसेन्ट इंग्लिश हायस्कूलचा शेख महम्मद रफेल रिझवान हा विद्यार्थी विजेता ठरला आहे. पुण्याची आरोही दीक्षित ही तिसरी-चौथीच्या गटात विजेती ठरली असून ती डॉल्फिन इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. शेतकऱ्यांकडून मिळणारी प्रेरणा तिने डूडलमधून मांडली आहे. गांधीजींची तीन माकडे तिने डूडलमध्ये रेखाटली आहेत. नववी-दहावीच्या गटात मुंबईच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या ध्वनित नागर याने विजेतेपद पटकावले आहे. त्याचे प्रेरणास्थान प्राणी आहेत. आपल्या चित्रात त्याने प्राणी आणि त्यांची वैशिष्टय़े रेखाटली आहेत.

चित्रकला, खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधन या गोष्टी मला आवडतात. त्यामुळेच ‘माझे प्रेरणास्थान’ या विषयासाठी अवकाश संशोधन हा मुद्दा मी निवडला. अवकाशातील अनेक गोष्टी अद्याप अज्ञात आहेत. तिथे नवे काही शोधण्यास खूप वाव आहे हे मी डूडलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. मी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आहेत आणि मला पुढे कला क्षेत्रातच करिअर करायचे आहे.

– पिंगला मोरे