घाटकोपर येथील असल्फा परिसरातील ७२ इंची व्यासाची जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच हाहाकार माजला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनी फुटली तेव्हा स्फोटासारखा जोरदार आवाज झाला. जलवाहिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की ४० ते ५० फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. अनेक लोकांच्या घरात पाण्याचा लोंढा शिरला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. याशिवाय, पाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत.
जमिनीच्या १० फूट खाली असलेली ही जलवाहिनी फुटल्याने ऐन दुष्काळात लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा कर्मचारी पवई येथील जलवाहिनीचा मुख्य पाणीपुरवठा बंद करण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर साधारण रात्री १ वाजता फुटलेल्या जलवाहिनीचा व्हॉल्व जोडण्यात आला. दरम्यान, काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नसीम खान यांनी केला.