25 September 2020

News Flash

पितृपक्षातले समाजभान

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो.

निमित्त : विद्याधर कुलकर्णी

स्वत:च्या पितरांना स्वर्गलोकी शांती मिळावी म्हणून केला जाणारा विधी आज अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, की स्वत:ला सोडून इतरांचा विचार करणारा नवा पायंडा घातला गेला आहे. निव्वळ कर्मकांडांमध्ये न अडकता किंवा ते करताना समाजातील वंचितांचा विचार आणि पितरांच्या नावे त्यांना अन्नदान हा विचार जन्माला आला आहे, त्याविषयी..

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा समज रूढ झाला आहे. कित्येकदा ऐपत नसतानाही कर्ज काढून पितरं जेवायला घातली जातात. मात्र, सध्याच्या काळात पितरं जेवायला घालणे योग्य आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. श्रद्धा जोपासण्याच्या नादात आपण अंधश्रद्धा कुरवाळत आहोत का? की रूढी-परंपरेचे अंधानुकरण करीत आहोत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे असले तरी काळानुरूप बदल घडताना दिसत आहेत. पारंपरिक पद्धतीने श्राद्ध करण्यापेक्षाही स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींच्या स्मृतीप्रीत्यर्थ समाजामध्ये विधायक काम करणाऱ्या संस्था, गरजू व्यक्ती यांना आर्थिक मदत देण्याकडे कल वाढला आहे. हा सकारात्मक बदल निश्चित होत आहे. त्यामुळेच काळाची गरज ओळखून पितृपक्ष समाजहितासाठी दक्ष होताना दिसून येत आहे. मी स्वत: धार्मिक प्रवृत्तीचा असलो तरी पितृपक्ष ही संकल्पना मला मान्य नाही. पितृपंधरवडय़ात श्राद्ध करण्यापेक्षा गरजू संस्था आणि गरजवंत व्यक्तींना अर्थसाह्य़ करतो, असे प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

आम्ही चौघी बहिणी. आई-वडिलांच्या निधनानंतर आम्ही विवेकवादी दृष्टिकोनातून श्राद्ध करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. त्याऐवजी गरजू व्यक्तीला आपल्या कुवतीनुसार अर्थसाह्य़ करून आई-वडिलांच्या स्मृती जपण्यात वेगळ्याच प्रकारचे समाधान लाभते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षी आमच्याकडे अनेक वर्षे काम करणाऱ्या महिलेला तिच्या औषधोपचारांसाठी काही रक्कम देऊन खारीचा वाटा उचलला आहे, असे शिक्षिका असलेल्या नंदिता कुसूरकर यांनी सांगितले. मी एक नोकरदार आहे. पितृपंधरवडय़ात आम्ही दरवर्षी एका गरजू संस्थेला काही रक्कम देतो. एक तर कामाच्या व्यापात श्राद्ध करण्यासाठी रजा मिळत नाही हे वास्तव आहे. श्राद्ध करून आणि जेवणावळी घालून मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते यावर माझा विश्वास नाही. त्यापेक्षा ज्यांना आवश्यकता आहे अशा गरजूंपर्यंत काही मदत पोहोचवता आली तरी आईला बरे वाटले असते हा आईनेच रुजवलेला संस्कार आचरणात आणतो, असे श्रीकांत दिवाणजी यांनी सांगितले.

अन्नदान पूर्णकर्म

‘सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अँड एन्व्हायर्नमेंट’चे संक्षिप्त रूप असलेल्या ‘स्वामी’ या मुंबईतील परळ भागातील संस्थेतर्फे पितृपक्षात अन्नदान करून मातृभाव जागविणारा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत मुंबईत विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वामी संस्थेच्या कार्यालयात दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रत्येकी तीन किलो तांदूळ आणि अर्धा किलो डाळ दिली जाते. पितृपक्षात मात्र, दररोज सुमारे ५० रुग्णांना धान्यवाटप केले जाते. यात सहभाग घेऊ  इच्छिणाऱ्यांनी धान्य, रोख रक्कम वा धनादेश यापैकी जे शक्य असेल ते स्वामी कार्यालयाकडे पाठवावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘स्वामी परिवारा’च्या साध्वी डोके, मोबाइल : ९८६९४५११५३ वा सुरेंद्र व्हटकर : मोबाइल ९८२०४१६३०५ यांच्याशी संपर्क साधावा.

देणे समाजाचे’ प्रदर्शन

सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशातून आर्टिस्ट्री संस्थेतर्फे पितृपंधरवडय़ाचे औचित्य साधून ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे शुक्रवारी (२० सप्टेंबर) एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. रविवापर्यंत (२२ सप्टेंबर) सकाळी १० ते रात्री ९ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, अशी माहिती संस्थेच्या वीणा गोखले यांनी दिली. पितृपक्षामध्ये आपल्या वाडवडिलांच्या नावाने श्राद्ध करून जेवणावळी घालण्यापेक्षा त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एखाद्या स्वयंसेवी संस्थेला देणगी द्यावी, या संस्थेच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. यंदाच्या प्रदर्शनामध्ये ग्रामीण युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि वसतिगृह चालविणारी संस्था, वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र, दत्तक देऊन नवजात अर्भकांचे संगोपन करणारे केंद्र, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह चालविणारी संस्था, सियाचीन येथील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लँट हा प्रकल्प हाती घेणारी संस्था, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांचे पुनर्वसन करणारी संस्था, मतिमंद तसेच फासेपारधी समाजातील मुलांचे शिक्षण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे, असे गोखले यांनी सांगितले.

पितृपक्ष म्हणजे काय?

पितृपक्षास हिंदू धर्मात त्यास विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवडय़ात लोक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात ज्यात गाय, कुत्रा आणि कावळा यांना विविध पदार्थ खाऊ  घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ  घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोचतात आणि आत्म्याची तृप्ती झाल्याने त्यांना विविध प्रकारे शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्युतिथीनुसार प्रतिपदा ते अमावास्या या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्युतिथी माहीत नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येस तर्पण करता येते. त्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्धकर्म होऊ शकते. मृत्यूनंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:55 am

Web Title: pitru paksha 2019 akp 94
Next Stories
1 भाजप-शिवसेना युती झाल्यास एकतर्फी लढतींची चिन्हे
2 किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता
3 चोरीच्या प्रबंधासाठी प्राध्यापकही सहभागी?
Just Now!
X