पीयूष गोयल यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारून पक्ष सोडला आणि आता काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाआघाडीत सामील झाले आहेत. मग त्यांनी काँग्रेस का सोडली होती, असे टीकास्त्र सोडत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पवारांचा निश्चित पराभव करू, असा विश्वास शनिवारी व्यक्त केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मन की बात’ आम्हाला माहीत असून युतीसाठी त्यांना निमंत्रण दिले आहे व त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. मात्र युती होणार किंवा नाही, हे शिवसेनेलाच विचारा, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत जाहीरनामा ठरविण्यासाठी भाजपने जनसंपर्क मोहीम हाती घेतली असून नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यानिमित्ताने गोयल आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राफेलवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. आम्ही विकासाचा विचार करून काम करीत असून ते आरोपांमध्ये वेळ घालवीत आहेत, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन गैरव्यवहार झाल्याचा मुद्दाही गोयल यांनी उपस्थित केला. भाजप सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यंत्रणा राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये अराजकाप्रमाणे परिस्थिती असून ममता बॅनर्जीचे सरकार पंतप्रधानांसह भाजप नेत्यांच्या सभांसाठी जागा मिळू देत नाही, हेलिकॉप्टर उतरण्याची परवानगी देत नाही, लोकांना येण्यात अडथळे आणले जातात. कम्युनिस्ट आणि ममता बॅनर्जीच्या राजवटीत पश्चिम बंगालचा विकास खुंटला आहे, अशी टीका गोयल यांनी केली.

मोदी सरकार हे जनतेसाठी समर्पण भूमिकेतून काम करीत असून त्यामुळेच जनतेच्या अपेक्षा आहेत. त्यासाठी १० कोटी लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असून सुमारे ७५०० सूचना पेटय़ा अनेक ठिकाणी ठेवल्या जातील आणि सूचनांचा समावेश जाहीरनाम्यात होईल. सुमारे ४०० रथही प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये फिरणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४३ जागा जिंकू आणि ४३वी जागा ही बारामतीची असेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडविली असून, बारामतीमध्ये सहज जिंकता येत नसल्यानेच बहुधा मतदान यंत्रांमध्ये गडबड करण्याची मुख्यमंत्र्यांची योजना असावी, असा टोला प्रदेशाध्यक्षांनी लगावला आहे. तर ४३च का, सर्व ४८ जागा का नाहीत, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.