महाव्यवस्थापकांची न्यायालयात माहिती
फलाटांची उंची न वाढवण्यावरून उच्च न्यायालयाने महाव्यवस्थापकांवरच अवमान कारवाईचे संकेत दिल्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वेने ऑगस्ट २०१७ पर्यंत मुंबईतील सर्व स्थानकांतील फलाटांची उंची वाढवण्यात येईल, असे आश्वासन गुरुवारी दिले. तर अपंगांसाठीच्या मूलभूत सुविधाही एप्रिलअखेरीपर्यंत उपलब्ध करून देण्याचा दावा दोन्ही रेल्वेंकडून करण्यात आला.
फलाटांची उंची वाढवण्याचे आदेश देऊनही अद्याप ते काम पूर्ण करण्यात आलेले नाही. गेल्या सात वर्षांमध्ये फलाट आणि लोकलच्या पायदानामध्ये असलेल्या पोकळीत पडून किती प्रवाशांनी जीव गमावला आहे, कितींना त्यामुळे अपंगत्व आले, जगाच्या पाठीवर असे अपघात होण्याचे ऐकीवात आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. तसेच हे काम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल याचे हमीपत्र लिहून द्या, अन्यथा अवमान कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा न्यायालयाने दोन्ही रेल्वेंच्या महाव्यवस्थापकांना मागील सुनावणीच्या वेळेस दिला होता.