मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही; कलानगर उड्डाणपुलाची एक मार्गिका खुली

मुंबई : कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या तीन मार्गिका उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या वेळी वरळी-शिवडी या उन्नत मार्गाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

‘‘मुंबई अनेकदा नियोजनाशिवाय वाढली आहे. अशा मुंबईमध्ये आता आखीवरेखीवपणाने विकास करत आहोत. या सुविधांचे काम नवीन शहर वसविण्यापेक्षाही कठीण आहे; पण आपले सरकार, महापालिका विकासाची पावले टाकते आहे. या विकासासाठी सरकार हे एमएमआरडीएसोबत आहे,’’ असे भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) या दोन्ही प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे.  कलानगर जंक्शन येथे तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे काम २०१७ पासून सुरू झाले. यापैकी वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे-वरळी सागरी मार्गाकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पण रविवारी झाले. उर्वरित दोन मार्गिकांचे ८० टक्के  काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवडी ते चिर्ले (नवी मुंबई) दरम्यानचा मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी मार्ग व सागरी किनारा मार्ग या दोहोंना जोडण्यासाठी वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.  हा उन्नत मार्ग तीन वर्षांत म्हणजे २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

वरळी-शिवडी उन्नत मार्ग वैशिष्ट्ये

पूर्व द्रुतगती मार्ग, शिवडी येथे हार्बर रेल्वे मार्ग, आंबेडकर रोड मोनो रेल्वे स्थानक, आंबेडकर रोडवरील उड्डाणपूल, परळ येथे मध्य आणि पश्चिाम रेल्वे मार्ग, सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून जाईल. या ठिकाणी सुमारे ४० ते ८५ मीटर लांबीच्या मोठ्या गाळ्यांसाठी (स्पॅन) स्टील स्ट्रक्चरचा वापर होईल. प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकाजवळील सध्याचा १०० वर्षे जुना उड्डाणपूल पाडून त्या जागी द्विस्तरीय रचना असलेला उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

वरळी-शिवडी ४.५१ किमीचा मार्ग

शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून उन्नत मार्गास सुरुवात होणार असून आचार्य दोंदे मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, ड्रेनेज चॅनेल रोड या मार्गावरून जात नारायण हर्डीकर मार्ग येथे समाप्त होईल. एकूण चारपदरी मार्ग असेल.

तीन मार्गिका उड्डाणपूल

  •  वरळी-वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ७१४.४० मीटरची दोनपदरी मार्गिका.
  • वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे-वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६०४.१० मीटरची दोनपदरी मार्गिका.
  •  धारावी टी जंक्शनकडून वांद्रे-वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३१०.१० मीटर लांबीची स्वतंत्र दोनपदरी मार्गिका.