भाजप अध्यक्ष अमित शहा गुरुवारच्या मुंबई भेटीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार नसल्याने वादंग निर्माण झाल्यामुळे आता ही भेट घडविण्याचे प्रयत्न शिवसेना व भाजपच्या नेत्यांकडून सुरु झाले आहेत. शिवसेनेने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असला तरी नरमाईची भूमिका घेत खासदार संजय राऊत यांनी शहा यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शहा यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला असून गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी ही भेट होण्याची चिन्हे आहेत. तर शहा-ठाकरे भेट होणार नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून मात्र ‘शहाणा हो’ अशी जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे.
ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह आदी नेत्यांनी मुंबईत आल्यावर बरेचदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेण्याची प्रथा ठेवली होती. शहा यांनी मात्र आपल्या पहिल्याच मुंबई भेटीत ठाकरे यांच्याशी भेट ठरविलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  
शहा व ठाकरे भेट होणार नाही, या वृत्ताने संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरुन ‘शहाणा हो’ प्रचार मोहीम सुरू केली आहे. ‘हा महाराष्ट्र आहे’ अशी समज देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे झुकून नरेंद्र मोदी आणि राजनाथसिंह अभिवादन करीत आहेत, असे हे पोस्टर आहे.  
एकीकडे सोशल मीडियामार्फत शिवसेना दबाव निर्माण करत असताना खा. संजय राऊत यांनी बुधवारी शहा यांची भेट घेतली. त्यानंतर शहा यांच्या कार्यक्रमात बदल झाला. आधी ते रात्री साडेसात वाजता लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास जाणार होते. आता ते दुपारी चार वाजता तेथे जाणार आहेत. शहा यांचे सर्व कार्यक्रम रात्री सव्वादहापर्यंत आटोपणार असून त्यानंतर वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये ही भेट होईल किंवा शहा हे ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जातील, अशी शक्यता आहे.
आमंत्रण मिळाले तर भेटतील..
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही. शिवसेनेकडून भेटीचे निमंत्रण आले तर शहा ठाकरेंना निश्चित भेटतील, असे भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्याने सांगितले. शहांची मुंबईभेट ही युतीतील तणाव वा जागावाटप यासाठी नाही तर संघटनात्मक पातळीवरील चर्चा करण्यासाठी आहे, असेही या नेत्याने स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चालवलेल्या ‘शहाणा हो’ पोस्टरबाजीवर भाजपने सावध पवित्रा घेतला असून, बाळासाहेबांविषयी भाजपच्या नेत्यांना आदरच आहे, असे भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे.